आत्राम पिता- कन्येच्या लढाईत आता तिसरा उमेदवार कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:10 PM2024-10-25T16:10:29+5:302024-10-25T16:12:22+5:30
अम्ब्रीशरावांची दुहेरी कोंडी : महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महायुतीकडून अहेरीत अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्याविरोधात कोण येणार, याची उत्सुकता होती. अखेर २४ ऑक्टोबरला महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कोट्यातून भाग्यश्री आत्राम (हलेगकर) यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आता आत्राम पिता- कन्येच्या लढाईत तिसरा कोण मैदानात येतो, याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
अहेरीचे राजकारण नेहमीच आत्राम राजपरिवाराभोवती फिरत आले आहे. येथे भाऊ-भाऊ, काका-पुतण्यानंतर आता पिता कन्या हे नवे राजकीय नाट्य रंगणार आहे. मागील दोन टर्मपासून धर्मरावबाबा यांचा सामना पुतणे अम्ब्रीशराव यांच्यासोबत होत आहे. मात्र, धर्मरावबाबा हे महायुतीत सामील झाले.
महायुतीची मिळवत त्यांनी आघाडी घेतली. अम्ब्रीशराव यांनी धर्मरावबाबा यांच्याविरुध्द जाहीरपणे बंड पुकारले, पण राजकीय दिशा ठरली नाही. याच दरम्यान कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांशी बिनसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे स्वपक्षातीलच एक गट देखील नाराज असल्याची चर्चा आहे. आत्राम कन्या व पिता यांच्यातच सामना रंगणार की पिता- कन्येत तिसरा भिडू आखाड्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दोन्हीकडे हुकली संधी, आता पुढची दिशा काय ?
तथापि, अम्ब्रीशराव यांनी महायुतीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले, पण धर्मरावबाबा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) व काँग्रेसकडून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी चाचपणी केली. मात्र, यश आले नाही. त्यामुळे त्यांची दुहेरी कोंडी झाली. आता ते इतर कोणत्या पक्षात प्रवेश करतात, की अपक्ष म्हणून मैदानात येतात, याची उत्सुकता आहे.
हणमंतु मडावींमुळे भाग्यश्री यांची अडचण
दरम्यान, अहेरीची जागा आपल्याकडेच रहावी यासाठी काँग्रेस नेते अडून बसले होते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अहेरीत मेळावा नुकतीच हणमंतु मडावी यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र, भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता हणमंतु मडावी हे बंडाचे निशाण फडकावण्याच्या तयारीत आहेत. निवृत्त सहायक उपवनसंरक्षक व काँग्रेस आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष असलेल्या हणमंतु मडावी यांच्या बंडखोरीचा भाग्यश्री आत्राम यांना जबर फटका बसू शकतो.
यापूर्वी अपयश
भाग्यश्री आत्राम यांनी २०१४ मध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादीकडून नशीब आजमावले होते. यात भाजपच्या डॉ. देवराव होळी यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. भाग्यश्री आत्राम यांनी १८ हजार २८० मते घेतली होती व दुसऱ्या स्थानी होत्या.