नवीन पालकमंत्री कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:17 PM2019-06-17T23:17:29+5:302019-06-17T23:17:44+5:30
विद्यमान राज्य सरकारचा जेमतेम दोन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना राज्यातील इतर काही मंत्र्यांसह गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. आता नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी येणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वने आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यमान राज्य सरकारचा जेमतेम दोन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना राज्यातील इतर काही मंत्र्यांसह गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. आता नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी येणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वने आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरत आहे.
नवीन पालकमंत्र्यांना आपली छाप पाडण्यासाठी अत्यल्प काळ मिळणार असला तरी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी आल्यास जिल्ह्याला लाभ होईल, असे अंदाज बांधले जात आहेत. निधीअभावी रेंगाळलेली अनेक कामे शेवटच्या टप्प्यात मार्गी लागल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघातील ६ पैकी ५ विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी आहे. परंतू केवळ अहेरी या एकमेव मतदार संघात भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्यापेक्षा काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांना ६ हजारांहून अधिक मते जास्त मिळाली आहेत. त्यामुळे अहेरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे राज्यमंत्रिपद काढून घेण्यात आले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे त्यांच्याकडे असलेले पालकत्वही निघाले आहे.
आघाडी सरकारच्या काळात या जिल्ह्याचे पालकत्व आर.आर.पाटील यांनी स्वीकारले होते. त्यावेळी अनेक मोठ्या कामांची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. त्यानंतर सरकार बदलताच अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे पालकत्व आल्याने जिल्हावासियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतू ती अपेक्षापूर्ती करण्यात त्यांना यश येऊ शकले नाही. त्याचाही अंदाज पक्षाने घेतला होता. अहेरी मतदार संघात झालेली भाजपची ही पिछेहाट थांबविण्यासाठी भाजप कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे अहेरी मतदार संघावर भाजपचे आधीही फारसे वर्चस्व नव्हते. या मतदार संघावर राष्टÑवादी काँग्रेसची पकड बºयापैकी आहे. राजेंचे मंत्रिपद गेल्याने राष्टÑवादीचे वर्चस्व आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दुसरीकडे भाजपकडे या मतदार संघात दुसरा कोणी सक्षम चेहरा नाही. त्यामुळे राजेंच्या हाती पुन्हा भाजपचा झेंडा येणार की ते नाग विदर्भ आंदोलन समितीचा झेंडा पुढे करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले अहे.
मुख्यमंत्र्यांनी दिला होता इशारा
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला आपापल्या विधानसभा क्षेत्रात मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांवर टाकली होती. तसे न झाल्यास विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्याचा इशाराही दिला होता. असे असताना अहेरी मतदार संघात भाजपची पिछेहाट झाली. त्याचा परिणाम म्हणून अम्ब्रिशराव आत्राम यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय इतरही काही गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.