गोंडवानाच्या गोंधळाला जबाबदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:03 AM2017-12-11T00:03:01+5:302017-12-11T00:03:16+5:30
सहा वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या आणि अभ्यास मंडळाची बहुप्रतीक्षित निवडणूक अखेर रविवारी पार पडली.
मनोज ताजने ।
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : सहा वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या आणि अभ्यास मंडळाची बहुप्रतीक्षित निवडणूक अखेर रविवारी पार पडली. विद्यापीठाची ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदार जास्त असणाºया केंद्रांवर चांगलाच गोंधळ उडाला. परिणामी ४० टक्के मतदारांनी मतदान न करताच केंद्रांवरून माघारी फिरणे पसंत केले. यासाठी विद्यापीठ प्रशासनच सर्वस्वी जबाबदार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या २०८ महाविद्यालयांमधील एक लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरविणाºया गोंडवाना विद्यापीठाचा कारभार दिवसेंदिवस अधिक चांगला होण्यासाठी योग्य ते बदल करावेत, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी अभ्यासक्रमात योग्य त्या गोष्टींचा समावेश करावा, प्रशासकीय कारभारावर नियंत्रण असावे यासाठी विद्यापीठाच्या विविध समित्या व अभ्यास मंडळांची निवड केली जाते. अडीच वर्षांपासून विद्यापीठाचा कारभार थेट नियुक्त केलेल्या समित्यांमार्फतच सुरू होता. मर्जीतील लोक समित्यांवर असल्यामुळे कोणत्या कामाला कोणाचा विरोध नाही, की कोणत्या सुधारणा नाही. सर्वच कारभार ‘आॅल ईज वेल’ म्हणत सुरू होता. पण रविवारी पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत विद्यापीठात कार्यक्षम आणि दूरदृष्टी असणारे लोक निवडता येईल म्हणून ११ हजारांवर पदवीधर मतदार मतदानासाठी सज्ज होते. मात्र त्यांच्या उत्साहावर विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे विरजण पडले.
अधिसभा, विद्वत परिषद आणि विविध अभ्यास मंडळांसाठी मतदान करताना मतदारांची तारांबळ उडत होती. पदवीधर मतदाराला एकूण ३१ उमेदवारांमधून पसंतीक्रमानुसार १० उमेदवारांची निवड करायची होती. प्राध्यापकांना २० तर प्राचार्यांना ३० उमेदवारांना मतदान करायचे होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला ५ ते १० मिनिटे लागत होती. परिणामी रांगेत २ ते ३ तास उभे राहून प्रतीक्षा करणे शक्य नसलेल्या मतदारांनी गर्दी कमी झाल्यानंतर येऊ, असा विचार करून काढता पाय घेतला. पण नंतर केंद्रावर आले तरीही तीच अवस्था त्यांना दिसत होती. वास्तविक मतदानासाठी लागणारा वेळ लक्षात घेता जास्तीत जास्त किती मतदारांसाठी एक केंद्र असावे याचा अंदाज विद्यापीठाचा कारभार चालविणाºया अनुभवी लोकांना असणे गरजेचे होते. परंतू ११ हजार मतदारांसाठी अवघे ३६ केंद्र देण्यात आले. परिणामी मतदान अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी झाले.
गडचिरोली जिल्ह्यात अवघे १२ मतदार असणाºया भामरागड आणि २९ मतदार असणाºया मुलचेरात प्रत्येकी एक मतदान केंद्र तर सर्वाधिक १३९६ मतदार असणाºया गडचिरोलीसाठी फक्त २ केंद्र ठेवण्यात आले. विद्यापीठाच्या अपुºया कर्मचाºयांमुळे पुरेसे मतदान केंद्र देता आले नाही, असे कारण देऊन कुलगुरू मोकळे झाले. पण निवडणुकीसारख्या महत्वाच्या प्रक्रियेसाठी केवळ विद्यापीठाच्या कर्मचाºयांच्या भरोशावर न राहता इतर सरकारी कर्मचाºयांची, अधिकाºयांची मदत घेणे अशक्य नव्हते. मात्र तसा प्रयत्नही विद्यापीठाच्या हुशार प्रशासनाने केला नाही. आता जे लोक विद्यापीठावर निवडल्या जाणार त्यांच्या निवडीत आपले योगदान नाही याचे शल्य मतदानापासून वंचित राहिलेल्या तमाम मतदारांना बोचत राहणार. यापुढे तरी विद्यापीठ प्रशासनाचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा ठेवुया.