अवैध दारूविक्री रोखणार कोण?
By admin | Published: November 11, 2014 10:40 PM2014-11-11T22:40:57+5:302014-11-11T22:40:57+5:30
१९९२ मध्ये दारूबंदी करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे प्रत्येक गावात दारूची अवैध विक्री सुरू आहे. दारूविक्रीच्या भरवशावर या व्यवसायात काम करणारे लोक लक्षाधीश झाले आहेत.
गडचिरोली : १९९२ मध्ये दारूबंदी करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे प्रत्येक गावात दारूची अवैध विक्री सुरू आहे. दारूविक्रीच्या भरवशावर या व्यवसायात काम करणारे लोक लक्षाधीश झाले आहेत. दारूमुळे अनेकांचे संसार उद्धस्त झाले असून अवैध दारू विक्रीतून खरेदी केलेली बनावटी दारू पिल्याने आजारामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. मात्र राज्य सरकारला अजूनही दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारूची अवैध विक्री रोखण्याचे काम नेमके कुणाचे याबाबत निश्चित धोरण तयार करता आलेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन हप्ते कमाविण्यासाठी या दारूबंदीचा पुरेपुर फायदा घेत आहेत. तर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही ग्रहण लागते त्याप्रमाणे वर्षात २-३ धाडी घालून आपला विभाग जिवंत असल्याचे दर्शन जनतेला घडवून देत आहे.
१९९२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व राणी बंग यांच्या नेतृत्वात दारूबंदीबाबत मोठे आंदोलन झाल्याने राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोली हा दारूबंदी असलेला राज्यातला दुसरा जिल्हा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यातही सरकारने दारूबंदी केली आहे. या दोनही जिल्ह्यात दारूबंदीचे अनुभव अत्यंत बिकट आहे. दारूबंदी असतांनाही राजरोसपणे दारूची विक्री केली जाते. गडचिरोली शहरातून दुचाकी व चारचाकीवर भर दिवसा दारूची वाहतूक केली जाते. दारूचे अवैध विक्रेते कोण याची पूर्ण माहिती गडचिरोली पोलीस प्रशासनाला आहे. गडचिरोली शहरात पोलीस ठाण्याचे अनेक कर्मचारी दररोज या अवैध दारूविक्रेत्यांचे दर्शन घेऊन धन्य होतात. परंतु कधीही या दारूविक्रेंत्यांवर मोठी कारवाई केली जात नाही. कोरचीपासून सिरोंचापर्यंत ८-१० गावे सोडली तर प्रत्येक गावात हमखास अवैध दारूविक्री सुरू आहे. कुरखेडा, कोरची, आरमोरी या भागात बनावटी दारूचे मोठे कारखानेही आहेत. यांच्यावर कारवाई पोलीस प्रशासन करीत नाही. त्यामुळे गडचिरोलीत दारूबंदी असूनही महाराष्ट्रात सर्वाधिक दारूविक्री येथेच होते, असे चित्र आहे. राज्य सरकारने दारूची अवैध विक्री रोखण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनावर सोपविली आहे. वर्धा व गडचिरोली या दोनही जिल्ह्यात पोलीस प्रशासन दारूची अवैध विक्री रोखण्यात अपयशी ठरले आहेत. नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा येथे केला जातो. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला ३० दुकानांचा वेढा पडलेला आहे. दारूबंदी करणाऱ्या गावातील शौकीन शेजारच्या गावात जाऊन दारू पिऊन येतात, असे चित्र आहे. राज्यसरकारने चंद्रपूरच्या दारूबंदीचा निर्णय करण्यापूर्वी या तिनही जिल्ह्यात दारूबंदीबाबत स्वतंत्ररित्या अंमलबजावणी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. (जिल्हा प्रतिनिधी)