अहेरीत भाजपची लॉटरी कुणाला लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:28+5:30

राजघराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आत्राम घराण्याचे अहेरी मतदार संघावर आतापर्यंत वर्चस्व राहिले आहे. विद्यमान आमदार अम्ब्रिशराव हे सध्या या राजघराण्याच्या गादीचे वारसदार म्हणून विराजमान आहेत. गेल्यावेळी भाजपच्या तिकीटवर पहिल्यांदाच विधानसभा लढल्यानंतर युवा आणि फ्रेश उमेदवार म्हणून त्यांच्या बाजुने मतदारांनी कौल दिला.

Who will win the BJP lottery? | अहेरीत भाजपची लॉटरी कुणाला लागणार?

अहेरीत भाजपची लॉटरी कुणाला लागणार?

Next
ठळक मुद्देकार्यकर्ते संभ्रमात : बाबा, दादा की राजेंनाच मिळणार पुन्हा संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांपैकी सध्या सर्वाधिक चर्चेत आहे तो अहेरी मतदार संघ. या मतदार संघात ज्या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत रंगणार असे चित्र आतापर्यंत होते, त्या तीनही उमेदवारांचा डोळा भाजपच्या तिकीटवर आहे. भाजपने त्यांच्यावर आपला गळ टाकत त्यांना आशेवर ठेवले आहे. मात्र ऐनवेळी कोणता निर्णय घेतला जाईल याचा ‘नेम’ नसल्यामुळे भाजपचा हा ‘गेम’ कोणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा रंगत आहे.
राजघराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आत्राम घराण्याचे अहेरी मतदार संघावर आतापर्यंत वर्चस्व राहिले आहे. विद्यमान आमदार अम्ब्रिशराव हे सध्या या राजघराण्याच्या गादीचे वारसदार म्हणून विराजमान आहेत. गेल्यावेळी भाजपच्या तिकीटवर पहिल्यांदाच विधानसभा लढल्यानंतर युवा आणि फ्रेश उमेदवार म्हणून त्यांच्या बाजुने मतदारांनी कौल दिला. भाजपने त्यांना राज्यमंत्रीपदही बहाल केले. पण लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजप उमेदवाराला कमी मते पडल्याचे कारण देत त्यांना राज्यमंत्रीपद गमवावे लागले. आता विधानसभेचे तिकीटही त्यांना मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित आहे. मात्र अम्ब्रिशराव तिकीट आपल्यालाच मिळणार याबद्दल खात्री बाळगून आहेत.
तिकडे अम्ब्रिशराव यांना वगळण्याची वेळ आलीच तर पर्याय कोण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांच्यावर गळ टाकण्यात आला. या मतदार संघावर राजघराण्यातील उमेदवाराचा प्रभाव जास्त राहात असल्यामुळे धर्मरावबाबांचा पर्याय योग्य राहील का, यावर भाजपच्या एका गोटातून प्रस्ताव मांडण्यात आला. पण धर्मरावबाबांनी आपल्या काही अटी टाकल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश होणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेलाही त्यांनी प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगत अनुपस्थिती दर्शविल्याने धर्मरावबाबांच्या मनात नेमके काय आहे, असा प्रश्न कायम आहे.
या मतदार संघाचे एक वेळ नेतृत्व करणारे दीपक आत्राम हे आपल्या आदिवासी विद्यार्थी संघाच्या बॅनरखाली जनसंपर्क ठेवून आहेत. ते राजघराण्यातील नसले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या मतदार संघावर बऱ्यापैकी प्रभाव पाडला आहे. भाजपसारख्या मोठ्या पक्षाचे बॅनर मिळाल्यास विजयाचे गणित सोपे होईल म्हणून तेसुद्धा भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. खासदार अशोक नेते यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या या मतदार संघात घेतलेल्या कार्यकर्ता बैठकीत त्यांच्या नावावर चर्चाही झाली. मात्र दोन दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष बदलल्याने दीपक आत्राम यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे.
भाजपवर वर्चस्व ठेवणाऱ्या संघाच्या गोटातून मात्र सर्व शक्यतांना बगल देत संदीप कोरेत हे नवीनच नाव पुढे करण्यात आले आहे. कोरेत यांचा जनसंपर्क फारसा नसला तरी संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांना पक्षाने संधी द्यावी यासाठी एक गट जोर लावून आहे. वरील तीनही उमेदवारांना हुलकावणी देऊन कोरेत यांना भाजपची तिकीट मिळाली तर या मतदार संघातील लढत आणखी चुरसपूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Who will win the BJP lottery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा