फ्रिजवाल गाई कुणाच्या? आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 06:00 AM2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:28+5:30
प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने सदर गाई दोन महिन्यांपासून आपल्या ताब्यात ठेवून आम्हाला दिल्या नाही व आमची दिशाभूल आणि फसवणूक केली, असा आरोप शेतकऱ्यांनी आरमोरीच्या तहसीलदारांना गुरूवारी दिलेल्या निवेदनात केला. यासोबतच आम्हाला गायी मिळाल्या नाही तर उपोषणाला बसू असा इशारा निवेदनातून दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी पुण्यावरून आणण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या फ्रिजवाल गाई आपल्यालाच मिळाव्या यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आॅफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने सदर गाई ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या आरमोरी तालुक्यातील शिवणी येथे गुरूवारी अनेक शेतकऱ्यांनी जाऊन गायींची मागणी केली. आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी वेळीच तिथे पोहोचून शेतकऱ्यांना समजावले. जिल्हाधिकारी यावर लवकरच तोडगा काढून योग्य तो निर्णय घेईल, अशी समजूत घातल्याने शेतकरी नरमले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेण्यासाठी शनिवार दि.२१ रोजी संबंधित अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली असून यात सदर गायी कोणाच्या ताब्यात राहणार यावर निर्णय होईल.
प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने सदर गाई दोन महिन्यांपासून आपल्या ताब्यात ठेवून आम्हाला दिल्या नाही व आमची दिशाभूल आणि फसवणूक केली, असा आरोप शेतकऱ्यांनी आरमोरीच्या तहसीलदारांना गुरूवारी दिलेल्या निवेदनात केला. यासोबतच आम्हाला गायी मिळाल्या नाही तर उपोषणाला बसू असा इशारा निवेदनातून दिला.
गेल्या सोमवारी (दि.१६) देसाईगंज तालुक्यातील वळू माता संगोपन केंद्रात झालेल्या बैठकीत प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीचे भागधारक म्हणून दाखविलेल्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. कंपनीने त्यांच्याकडील गायी शेतकऱ्यांना देण्यासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चापोटी प्रतिगाय १९ हजार ५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची अट टाकली. परंतू शेतकऱ्यांनी एवढे पैसे देण्यास ठाम नकार दिला.
यावर तोडगा काढण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला जि.प.कृषी सभापती नाना नाकाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी यांच्यासह फार्मर्स कंपनीचे संचालक घनश्याम तिजारे आणि दि.१६ च्या बैठकीत शेतकऱ्यांनी निवडलेले पाच प्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्व पशुपालकांचे लक्ष लागले आहे.
प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीसोबतच पशुसंवर्धन विभागाच्या गाई वळू माता केंद्रात १०० फ्रिजवाल गाई देण्यात आल्या आहेत. त्या गायीसुद्धा शेतकऱ्यांना वाटप केल्या जाणार का? याबद्दल शेतकऱ्यांमध्ये औत्सुक्य आहे. याबाबतही शनिवारच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
प्रतिगाय ५ हजारांचा खर्च देण्यास तयार
प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने पुण्यावरून सदर गाई आणून दोन महिने त्यांचे संगोपन केले. त्याचा खर्च म्हणून प्रतिगाय ५ हजार रुपयापर्यंत खर्च देण्याची तयारी काही शेतकऱ्यांनी दर्शवली आहे. मात्र कंपनीचे संचालक म्हणतात त्याप्रमाणे २० हजार रुपयांचा खर्च हा अवाजवी असून तो देण्यास शेतकऱ्यांनी असमर्थता दर्शविली आहे. ज्या गाई मरण पावल्या त्याची जबाबदारी कोणाची हे निश्चित करून कंपनीच्या संचालकांनी योग्य देखभाल केली नसल्यामुळेच त्या महागड्या गाई मृत्यूच्या खाईत लोटल्या गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शिवाय शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या गायींचा वेळीच विमा उतरविला असता तर नुकसानभरपाई मिळाली असली. पण कंपनीच्या चुकीमुळे त्यापासूनही वंचित राहावे लागत असल्याचे शल्य शेतकऱ्यांनी व्यक्त केले.