दिभना मार्गाचे रुंदीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:49+5:302021-07-14T04:41:49+5:30

फवारणी न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव अहेरी : आरोग्य विभागाच्या वतीने गावागावात फवारणी न झाल्याने यंदा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढणार ...

Widen the Dibhana route | दिभना मार्गाचे रुंदीकरण करा

दिभना मार्गाचे रुंदीकरण करा

Next

फवारणी न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव

अहेरी : आरोग्य विभागाच्या वतीने गावागावात फवारणी न झाल्याने यंदा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढणार आहे. सध्या डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आलापल्ली शहरात नाल्यांचा उपसा ही नियमित हाेत नाही.

माहिती केंद्र निर्माण करण्याची मागणी

काेरची : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहिती अभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून हाेत आहे.

ग्राहकांना मिळते बनावट बिल

गडचिरोली : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार डुप्लिकेट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. शहरी भागातील अनेक दुकानदार जीएसटी क्रमांक नसलेले बनावट बिल ग्राहकांना देत आहेत.

दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करावे

अहेरी : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र, तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिव्यांग विकासापासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून विकास योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातील दिव्यांग व्यक्तींकडून करण्यात येत आहे.

हागणदारी मुक्तीवर प्रश्नचिन्ह

देसाईगंज : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापर करीत नाहीत. परिणामी, शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. घरी शाैचालय असूनही ग्रामीण भागातील वयाेवृद्ध, जुन्या विचाराचे लाेक बाहेर शाैचालयास जात आहेत.

बसस्थानकाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच

चामाेर्शी : तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला. लाेकप्रतिनिधींनी बसस्थानक उभारू, अशी ग्वाही दिली. अद्यापही हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने नाराजी आहे.

ग्रामीण भागात वीज चोरी वाढली

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रम दरम्यान विजेच्या तारांवर आकडा टाकून वीजचोरी केली जात आहे.

कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे

अहेरी : कुंभार समाजासाठी संत गोरोबाकाका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व वीटभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द कराव्यात, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळाऊ लाकूड देण्याची मागणी कुंभार समाज महासंघाने केली आहे.

रेडिअम अभावी अपघाताची शक्यता

कुरखेडा : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडिअम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. माेठा अपघात हाेऊ नये, यासाठी रेडिअमच्या पट्ट्या लावाव्या.

याेजनांची माहिती मिळेना

देसाईगंज : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याचे दिसून येते.

पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज

गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथील बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने नेत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.

जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई

आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशु सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.

घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावर घाण पाण्याचे डबके तसेच गटारे निर्माण झाले आहेत. या गटाराच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा

गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्ड पर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी होत आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार ?

गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने व्यवस्था अपुरी आहे.

युवक गुंतले सट्टापट्टीच्या व्यवसायात

गडचिरोली : ग्रामीण भागात सट्टापट्टी सुरू आहे. अनेक युवक एजंट म्हणून सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.

मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा

सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

शहरातील पक्के अतिक्रमण कायमच

आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, या चारही मार्गावर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत

देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही. वारंवार महावितरणच्या कार्यालयात येरझारा मारूनही शेतकऱ्यांचे काम झाले नाही.

Web Title: Widen the Dibhana route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.