आरमोरी शहरातील मुख्य मार्गावर गतिरोधक उभारून रस्ता रुंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:28+5:302021-08-23T04:39:28+5:30
गडचिरोलीवरून आरमोरीमार्गे नागपूर, भंडारा, गोंदिया व इतर अनेक ठिकाणी येणारी तसेच जाणारी लहान व मोठी, जड वाहने या मार्गावरून ...
गडचिरोलीवरून आरमोरीमार्गे नागपूर, भंडारा, गोंदिया व इतर अनेक ठिकाणी येणारी तसेच जाणारी लहान व मोठी, जड वाहने या मार्गावरून दिवसरात्र धावत असतात. त्यामुळे या मुख्य मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. दिवसेंदिवस वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाहतूक करण्यासाठी रस्ते अरुंद पडत असल्याने या मार्गावर लहानमोठे अपघात नेहमीच घडत आहेत.
आरमोरी शहरात गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग मंदावत नाही. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणीही वाहने सुसाट धावतात. तसेच अनेक ठिकाणी मुख्य मार्गावर विजेचे खांब व झाडे असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्यालगत असलेल्या अनेक दुकानदारांनी शेड उभारल्याने वाहतुकीची समस्याही उद्भवत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गावर इंदिरा गांधी चौक, जुना बसस्थानक, भगतसिंग चौक, पंचायत समिती, यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल, नवीन बसस्थानक, वडसा टी पाॅइंट, महात्मा गांधी महाविद्यालय, तहसील कार्यालय व इतर अनेक ठिकाणी गतिरोधक उभारल्यास भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताच्या प्रमाणात घट होईल. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गावरील अनेक चौकांत वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावे, रस्त्यावरील विजेचे खांब हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी खरवडे व सय्यद यांनी केली आहे.