ट्रॅक्टरची दुचाकीला जबर धडक; पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 04:47 PM2022-04-25T16:47:58+5:302022-04-25T16:51:34+5:30
पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोरची (गडचिरोली) : कोरचीपासून पाच किलोमीटर अंतरावरील सातपुती गावाच्या रस्त्यावर रविवारी सायंकाळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका ट्रॅक्टरने दुचाकी वाहनाला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी खाली कोसळले. यात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी आहे. दुचाकीवरील कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते.
फुलेश्वरी झुमुक भेली (३८ वर्षे) असे मृत महिलेचे तर झुमुक भेली (४३) असे जखमी पतीचे नाव आहे. ते कोरची तालुक्याच्या कोचिनारा गावातील रहिवासी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कोचिनारा गावातील भेली दाम्पत्य छत्तीसगडच्या ढोडरी गावात अंत्यसंस्कारासाठी गेले होते. अंत्यविधी झाल्यानंतर हे पती-पत्नी दुचाकीवरून गावी परत येत असताना हा अपघात घडला. कोचिनारा येथील समाजसेवक शमशेरखाँ पठाण यांनी फोनवरून कोरची पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तो ट्रॅक्टर गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातल्या कोसबी गावातील असल्याचे सांगण्यात येते. कोरची पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनात बेळगाव पोलीस मदत केंद्राचे पोउनि नितीश पोटे अधिक तपास करीत आहेत.
पळून जाणाऱ्या चालकाला गावकऱ्यांनी पकडले
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने (एम.एच. ३५, जी. ६४५७) त्यांच्या दुचाकीला (सी.जी. ०८, एस ८३४९) जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टरचे चाक महिलेच्या अंगावरून गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पतीला कोचिनारा गावातील लोकांनी प्राथमिक उपचाराकरिता कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रॅक्टरच्या चालकाने तेथून पळून जाण्याच्या प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी त्याला पकडले.