ते पुन्हा आले...खोब्रामेंढातील धानपीक व झोपड्यांची केली नासधूस !
By गेापाल लाजुरकर | Published: April 18, 2023 12:54 PM2023-04-18T12:54:46+5:302023-04-18T12:55:43+5:30
मालेवाडा वनपरिक्षेत्रात वावर : रानटी १० हत्तींचा कळप आक्रमक
मालेवाडा (गडचिरोली) : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात वावर असलेल्या रानटी हत्तींनी आठवडाभरापूर्वी छत्तीसगड राज्यात काढता पाय घेतला होता; परंतु १४ एप्रिल रोजी ८ ते १० च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा छत्तीसगड राज्यातून मुरुमगाव पूर्व वन परिक्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर ते मालेवाडा वन परिक्षेत्रात दाखल झाले. दरम्यान १५ एप्रिल रोजी त्यांनी धान पिकासह शेतातील झोपड्यांची नासधूस केली.
छत्तीसगड राज्यातून रानटी हत्तींनी मुरुमगाव पूर्व वनपरिक्षेत्रात प्रवेश केला. तेथून मालेवाडा वन परिक्षेत्रातील नियतक्षेत्र तलवारगडच्या जंगलात दाखल झाले. याच परिसरातील गांगसाय टोला मार्गाने १५ एप्रिलच्या रात्री खोब्रामेंढा नियतक्षेत्रात येऊन संपत पोरेटी व घनचू पोरेटी रा. खोब्रामेंढा यांच्या धान शेतीचे नुकसान केले. त्या नंतर १६ एप्रिल रोजी रात्री खोब्रामेंढा येथील कुमारशहा कुंजाम यांच्या धान शेतीचे व रामसू पोरेटी यांच्या शेतीतील झोपड्यांची नासधूस केली. रानटी हत्तींनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सध्या हत्तींच्या कळपाने येडसकुही उपक्षेतील कक्ष क्रमांक ३५८ मध्ये प्रवेश केला आहे, अशी माहिती मालेवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर यांनी दिली.
अर्धा कळप छत्तीसगडमध्ये !
गडचिरोली जिल्ह्याच्या मालेवाडा वनपरिक्षेत्रात दाखल झालेला रानटी हत्तींचा हा केवळ अर्धा कळप आहे. अर्धा कळप छत्तीसगढ राज्यात आहे. तो सुध्दा येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हत्तींच्या जवळ जाऊ नये किंवा चिथावणीखोर कृत्य करू नये, असे आवाहन आरएफओ संजय मेहर यांनी केले