कोरची तालुक्यात हत्तींचा पुन्हा उच्छाद; धावत्या दुचाकीस्वारांना खाली पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 03:33 PM2022-10-26T15:33:58+5:302022-10-26T15:44:00+5:30

दुचाकीस्वारांना हत्तींनी पाडण्याच्या घटनेसोबत जंगली हत्ती गावापासून जास्त लांब नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे.

Wild elephants hits speeding bikers in Korchi tehsil | कोरची तालुक्यात हत्तींचा पुन्हा उच्छाद; धावत्या दुचाकीस्वारांना खाली पाडले

कोरची तालुक्यात हत्तींचा पुन्हा उच्छाद; धावत्या दुचाकीस्वारांना खाली पाडले

Next

कोरची (गडचिरोली) : जंगली हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ आता देसाईगंज, कुरखेडानंतर पुन्हा कोरची तालुक्यात सुरू झाला आहे. अशातच दुचाकीवरून जात असलेल्या तिघांपैकी एकाला जंगली हत्तींच्या कळपातील एका हत्तीने सोंडेने ढकलले. त्यामुळे तिघेही जण दुचाकीवरून खाली पडले. प्रसंगावधान राखत त्यांनी जंगलात पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना रात्रीच्या अंधारात बराच वेळपर्यंत जंगलात भटकावे लागले. 

माहितीनुसार, येथील एका व्यापाऱ्याची प्रकृती बरी नसल्याने ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन आपल्या मुलासोबत दुचाकीने कोरचीला येत होते. दरम्यान, संध्याकाळी साडे सहा दरम्यान बेडगाव घाट ओलांडून झाल्यानंतर झंकारगोंदी गावाजवळील रस्त्यावर एकाएकी १५ ते २० जंगली हत्ती समोर आले.

अन् अंधारात जंगलात भटकत राहिले

  • जखमी अवस्थेत तिघेही जण पडल्यानंतर हत्तींपासून जीव वाचवण्यासाठी ते जंगलात इकडे-तिकडे पळत सुटले. पण या गडबडीत ते जंगलात भटकले, अंधार पडल्याने त्यांना मार्ग काढणे कठीण झाले होते. पाऊण तासानंतर जंगलातून मुख्य रस्त्यावरील प्रवासी वाहनांच्या लाईटचा प्रकाश त्यांना दिसला. त्यावरून अंदाज काढत त्यांना मुख्य रस्ता सापडला.
  • मुख्य रस्त्यावर आल्यानंतर त्यांनी कुरखेडावरून कोरचीला जाणाऱ्या अनेक वाहनांना हात दाखविला. हात जोडून विनवणी केल्यानंतरही कोणीही थांबायला तयार होत नव्हते. कारण या मार्गावर काही दिवसांपूर्वी लूटमारीच्या घडना घडल्या आहेत. त्यामुळे जोखीम पत्करायला कोणीही तयार नव्हते. एवढ्यात कुरखेडाकडे निघालेल्या कोरचीमधील एका ओळखीच्या व्यापाऱ्याने त्यांची मदत केली.

हत्तींच्या अस्तित्वामुळे वनविभाग सतर्क

कोरची तालुक्यात दुचाकीस्वारांना हत्तींनी पाडण्याच्या घटनेसोबत जंगली हत्ती गावापासून जास्त लांब नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. यासोबत वनविभागही सतर्क झाला आहे. तीन दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील लेकुरबोडी गावात रात्री जंगली हत्तीच्या कळपाने दोन घरांचे नुकसान करून उभ्या पिकांचीही हानी केली होती. तसेच एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर येथील नागरिकांनी हत्तीच्या दहशतीमुळे सलग तीन दिवस गावासभोवताल पहारा दिला. मसेली व लेकुरबोडी जंगल परिसरात बेडगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी आपल्या चमूला तैनात ठेवले, परंतु या सर्व घटनांमुळे कोरची तालुक्यातील नागरिकांना आणि दुचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Wild elephants hits speeding bikers in Korchi tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.