रानटी हत्ती रात्रभर बांधावर; धान पिकांत माजविला कहर
By गेापाल लाजुरकर | Published: July 23, 2023 07:13 PM2023-07-23T19:13:43+5:302023-07-23T19:14:01+5:30
चारभट्टीत केली नासधूस : गाेंदियातून आला कळप
गडचिराेली : कुरखेडा तालुका मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या चारभट्टी परिसरात शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटे दरम्यान गाेंदिया जिल्ह्यातून चाैदाच्या संख्येत रानटी हत्तींचा कळप आला. ह्या कळपाने धान शेतीत धुमाकूळ घालून परिसरातील अनेक हेक्टर धान पीक पायदळी तुडवून उद्ध्वस्त केले. यामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गोंदिया जिल्ह्याच्या राजोली-भरनोली परिसरातील जंगलातून शनिवारी रात्री चाैदाच्या संख्येत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने चारभट्टी परिसरात प्रवेश करीत येथील धान पिकाला पायदळी तुडवून नासधूस केली. शेतात हत्ती उपद्रव माजवत असल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागताच लाेकांनी समुहाने घटनास्थळाकडे धाव घेत टाॅर्चचा प्रकाश व मशाली पेटवून हत्तीच्या कळपाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला; परंतु हत्ती जुमानले नाहीत. पहाटेपर्यंत त्यांचा उपद्रव सुरूच हाेता. सूर्याेदय हाेत असताना हत्तींचा कळप जगंलाच्या दिशेने निघून गेला. सदर नुकसानीची माहिती मिळताच जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर तुलावी, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष परसराम नाट, वासुदेव निंबेकर, भास्कर किंचक आदींनी पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी केली. हत्तींच्या हालचालीवर क्षेत्र सहायक शेंडे, वनरक्षक काशीवार, वनमजूर विट्ठल मांडवे, मधुकर दरवडे आदी लक्ष ठेवून आहेत, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
ह्या शेतकऱ्यांचे झाले नुकसान
यावेळी चारभट्टी येथील शेतकरी सूर्यभान हर्षे, भागवत निंबेकर, फकिरा सोनबोईर, सोनाली मारगाये, जनकलाल भैसारे, पुसाऊ आडील, मनोहर आडील, भाऊराव तिरगम, केवळराम नाट, करंगसू कवडो, सुरेश कवडो, पतिराम कवडो, आनंदराव तिरग व जांभूळकर आदी शेतकऱ्यांच्या शेतातील धानपीक हत्तींच्या कळपाने पायदळी तुडवून नासधूस केली.