अदानी-अंबानीसाठी वनजमीन, मग रेल्वेमार्गासाठी का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:16 AM2018-09-21T00:16:31+5:302018-09-21T00:17:08+5:30
वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या कोरड्या गप्पाच मारल्या जात आहे. प्रत्यक्षात या मार्गाच्या उभारणीचे काम पुढे सरकतच नाही. वनविभाग जमीन देण्यास तयार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या कोरड्या गप्पाच मारल्या जात आहे. प्रत्यक्षात या मार्गाच्या उभारणीचे काम पुढे सरकतच नाही. वनविभाग जमीन देण्यास तयार नाही. पण या सरकारला अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींना वनजमीन देता येते, पण सामान्य माणसाच्या उपयोगाच्या रेल्वेमार्गासाठी जमीन देता येत नाही, अशी टिका काँग्रेस नेते माजी खा.नाना पटोले यांनी येथे केली.
काँग्रेस पक्षाच्या शेतकरी-शेतमजूर सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर देसाईगंजमध्ये प्रथम आगमनानिमित्त त्यांचा येथील राजीव गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पटोले यांच्यासह काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर आणि प्रदेश सचिव रविंद्र भोयर यांचाही माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी बोलताना पटोले यांनी भाजप सरकारवर कठोर टिका करताना पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत सरकार किती उदासीन आहे हे सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत जनता याचा जाब विचारेल, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी शिकून स्वयंरोजगारावर भर द्यावा तसेच शेतकºयांनी शेतीपूरक व्यवसायावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेसा मोटवानी यांनी केले. संचालन प्रा.ए.जी. शिवणकर यांनी तर आभार प्रा.सय्यद यांनी मानले.
या कार्यक्रमाला माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष परसराम टिकले, अॅड.एन.डी.किरसान, नगरसेवक हरिष मोटवानी, आरिफ खानानी, गणेश फाफट, अॅड.संजय गुरू, ईश्वर कुमरे, छोटे मस्जिद भोला, राजू रासेकर, प्रकाश समर्थ, माजी नगरसेवक शहेजाद शेख, तसेच जिल्हा महिला उपाध्यक्ष निलोफर शेख, तालुका अध्यक्ष आरती लहरी, नगरसेविका उत्तरा तुमराम, भावना तलमले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.