वन्यप्राण्यांचा हल्ला : चार वर्षात १०७ नागरिक जखमी- १३ जणांचा बळी
By admin | Published: November 22, 2014 01:14 AM2014-11-22T01:14:32+5:302014-11-22T01:14:32+5:30
७८ टक्के जंगल असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
गडचिरोली : ७८ टक्के जंगल असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावांकडे धाव घेत असल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सन २०१०-११ ते २०१३-१४ या चार वर्षात वन्यप्राणी हल्ल्यांच्या एकूण १३ घटना घडल्या असून यात १३ नागरिकांचा बळी गेला आहे. तर १०७ नागरिक जखमी झाले आहेत.
गडचिरोली वनवृत्तांतर्गत गडचिरोली, वडसा, आलापल्ली, सिरोंचा व भामरागड हे पाच वनविभाग आहेत. गडचिरोली या वनव्याप्त जिल्ह्यात एकूण २९ प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये बिबट, अस्वल, रानम्हैस, चितळ, भेडकी, सांबर, हरिण, काळविट, निलघोडा, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा, तळस, ससा, निलगाय, रोही, माकड, चौसिंगा, बेलमांजर, रानकुत्रा, सारस, रानगवा, मुंगूस, गिधाड, मोर, शेकरू व रानकोंबडी आदींचा समावेश आहे. गडचिरोली वनविभागाच्या तुलनेत आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वनविभागाच्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचे संख्या अधिक आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०१०-११ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे एक प्रकरण घडले. यात एका व्यक्तीचा बळी गेला असून २४ व्यक्ती जखमी झाले. २०११-१२ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे तीन नागरिकांचा बळी गेला असून २२ ननागरिक जखमी झाले. सन २०१२-१३ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे ९ प्रकरण झाले असून यात ९ जणांचा बळी गेला असून सर्वाधिक ५० नागरिक जखमी झाले होते. सन २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १० नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने पंचनामा करण्यात येतो. त्यानंतर आर्थिक मदतीसाठी सदर प्रस्ताव वनवृत्त कार्यालयाला पाठविल्या जातो.
सन २०१०-११ या वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतक व्यक्तीच्या कुटुंबीयांना वन विभागामार्फत २ लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर याच वर्षातील २५ जखमी व्यक्तींना ६ लाख २ हजार ७८ रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सन २०११-१२ या वर्षातील ३ मृतक व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख याप्रमाणे ६ लाख रूपयाची मदत देण्यात आली आहे. तर याच वर्षातील २२ जखमींना ५ लाख ४० हजार ७०१ रूपयाची मदत देण्यात आली आहे. २०१२-१३ या वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या ९ मृतकांच्या कुटुंबियांना १३ लाख ५० हजार रूपयाची मदत देण्यात आली आहे. याच वर्षात जखमी झालेल्या ५० नागरिकांना १३ लाख ५० हजार रूपयाची मदत देण्यात आली आहे. २०१३-१४ या चालू वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखरेपर्यंत झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील १० नागरिकांना ६ लाख रूपयाची आर्थिक मदत वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)