सभापतींचे खांदेपालट होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:10 PM2018-01-21T23:10:12+5:302018-01-21T23:10:23+5:30
गडचिरोली नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक २३ जानेवारी रोजी होत आहे. या नगर परिषदेत भाजपाची सत्ता आहे. सर्वच सदस्यांना पदे मिळतील, असे आश्वासन भाजप श्रेष्ठींकडून मागच्या वर्षीच देण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक २३ जानेवारी रोजी होत आहे. या नगर परिषदेत भाजपाची सत्ता आहे. सर्वच सदस्यांना पदे मिळतील, असे आश्वासन भाजप श्रेष्ठींकडून मागच्या वर्षीच देण्यात आले होते. त्यामुळे सभापतीपदांची खांदेपालट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही सदस्यांनी वरिष्ठांकडे मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
गडचिरोली नगर परिषदेत एकूण २५ सदस्य संख्या आहे. त्यापैकी २१ नगर सेवक भाजपाचे निवडून आले होते. निवडणुकीनंतर २ अपक्ष सदस्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता भाजपच्या सदस्यांची संख्या २३ वर पोहोचली आहे. विरोधी पक्षाचे केवळ २ सदस्य आहेत. भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने मागील वर्षी सभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान प्रत्येक सदस्याला एक वर्षासाठी सभापती बनविले जाईल, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. त्यामुळे आपल्याला पुन्हा सभापतीपद मिळणार नाही, याची शाश्वती असल्याने त्यांनी सभापती पदाच्या आशा सोडल्या आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोणाला कोणते पद द्यायचे ही संपूर्ण जबाबदारी पक्ष श्रेष्ठींवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे. सभापती पदाच्या निवडणुकीला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र अजुनपर्यंत सभापतीपद ठरले नसल्याची माहिती नगरसेवकांनी दिली तर काहींनी मात्र शनिवारी सकाळी जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला काही निवडक सदस्यांना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे त्यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली आहे.
सभापती पदाच्या निवडीत पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वाचा असला तरी बांधकाम सारखे वजनदार सभापतीपद मिळावे, यासाठी सद्यस्थितीत नगर परिषदेचे सदस्य असलेल्यांनी आपण कशी महत्त्वपूर्ण जबाबदारी पाडू, हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खा. अशोक नेते व पक्षश्रेष्ठींकडे केला जात आहे.
बांधकाम सभापती पदासाठी चुरस
नगर परिषदेमध्ये बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, शिक्षण सभापती, वित्त व नियोजन सभापती, महिला व बालकल्याण सभापती ही चार पदे राहतात. त्यापैकी बांधकाम सभापती हे वजनदार पद मानले जाते. त्यामुळे हे सभापतीपद भूषविण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. या पदासाठी मोर्चेबांधणी केली जात असल्याचे दिसून येते.
गडचिरोली नगर परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात फक्त एकदाच यशोधरा उसेंडी या बांधकाम सभापती बनल्या होत्या. त्यानंतर या पदावर पुरूष सदस्यांचीच मक्तेदारी राहिली आहे. आता नगर परिषदेत जवळपास ५० टक्के महिला सदस्य असल्याने बांधकाम सभापतीपदावर किमान आतातरी महिला सदस्याची वर्णी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.