जान देंगे, लेकीन जमीन नही देंगे...; 'तोडगट्टा'वरुन नक्षल्यांचा इशारा, ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदची हाक

By संजय तिपाले | Published: November 22, 2023 08:41 PM2023-11-22T20:41:34+5:302023-11-22T20:42:13+5:30

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे.

Will give life but will not give land Naxals warn of Todagatta call for district bandh on November 30 | जान देंगे, लेकीन जमीन नही देंगे...; 'तोडगट्टा'वरुन नक्षल्यांचा इशारा, ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदची हाक

प्रतिकात्मक फोटो

गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम तोडगट्टा येथे प्रस्तावित सहा लोह खाणींविरोधात सुरु असलेले  आंदोलन पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर उधळण्यात आले आहे. यावरुन आता नक्षली आक्रमक झाले आहेत. जान देंगे, लेकीन जमीन नही देंगे.. अशा शब्दांत माओवादी संघटनेचा पश्चिम सब जोनल प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रक जारी करुन पोलिसांना इशारा दिला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे.

स्थानिकांच्या विरोधानंतर दोन वर्षांपूर्वी सुरजागड येथे लोह खाण उत्खनन सुरु झाले. आता एटापल्ली तालुक्यात आणखी सहा लोह खाणी प्रस्तावित आहेत. यास विरोध करत मागील अडीचशे दिवसांपासून दमकोंडवाही खाण विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली परिसरातील नागरिकांचे तोडगट्टा येथे आंदोलन सुरु होते. २० नोव्हेंबरला आंदोलनस्थळापासून जवळच वांगेतुरी येथे पोलिस मदत केंद्र सुरु करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शंभर पोलिसांचे पथक परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना आंदोलक व पोलिसांमध्ये वाद झाला. आंदोलकांनी धक्काबुक्की करत वांगेतुरीला जाण्यापासून रोखल्यानंतर पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत काही आंदोलकनेत्यांना ताब्यात घेतले. यानंतर आंदोलक पांगले तेथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान, तोडगट्टा येथील आंदोलनकर्त्यांच्या अटकेवरुन माओवादी संघटनेचा प्रवक्ता श्रीनिवास याने २३ नोव्हेंबरला दोन पानी पत्रक जारी केले आहे.  

विकसित भारत यात्रेचा उद्देश मूळनिवासींचे अस्तित्व संपविणे व कॉर्पोरेट घराण्यांचा विकास करणे हा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. झारखंडमध्ये कोळसा खाणींविरोधात आदिवासी लढत आहेत. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिकांनी विरोध केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केली, असा आरोप या पत्रकात केला आहे. वांगेतुरी येथील पोलिस मदत केंद्र हटवा, आंदोलकांची सुटका करा या मागणीसाठी ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदची हाक दिली  असून ग्रामसभांनाही गावागावात आंदोलन सुरु करण्याचे आवाहन केले आहे.

मंत्री धर्मरावबाबांसह लोकप्रतिनिधींकडेही मागणी
दरम्यन, प्रवक्ता श्रीनिवास याने या पत्रकात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनाही आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या खाणींवरुनच मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना गेल्या काही महिन्यांत दोनवेळा नक्षल्यांनी धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

तोडगट्टा येथे पोलिसांनी बळाचा वापर केला असता तर कोणी तरी जखमी झाले असते, पण एकाही आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला नाही. या आंदोलनाच्या मागण्या सरकारविरोधी व नक्षल्यांचे समर्थन करणाऱ्या आहेत. नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठीच तेथे पोलिस मदत केंद्र उभारलेले आहे. 
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली
 

Web Title: Will give life but will not give land Naxals warn of Todagatta call for district bandh on November 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.