22 चा बहुचर्चित ओबीसी महामाेर्चा निघणार की नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 05:00 AM2021-02-14T05:00:00+5:302021-02-14T05:01:02+5:30
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता हा मोर्चा होणार किंवा नाही, याबाबत शंकेचे वातावरण निर्माण झाले असले तरी आयोजक मात्र महामोर्चा निघणारच, या भूमिकेवर ठाम आहेत. या मोर्चाला परवानगी मिळावी, यासाठी विविध पातळीवर प्रयत्नही केले जात आहेत. ओबीसी महासंघाचे प्रा. शेषराव येलेकर यांच्यासह सर्व ओबीसी संघटनांचे पदाधिकारी मोर्चाच्या तयारीला लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : इतर मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या २२ फेब्रुवारीला गडचिरोलीत ओबीसी महामाेर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला विविध सामाजिक संघटना, वेगवेगळे राजकीय पक्ष आणि नेत्यांनी पाठिंबा दर्शवत मोर्चात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. पण कोरोना अजून संपलेला नाही म्हणत पोलीस विभागाने या मोर्चाला परवानगीच नाकारल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, मोर्चाचे आयोजक मात्र मोर्चा काढणारच, अशी भूमिका घेऊन तयारीला लागले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पूर्ववत १९ टक्के व्हावे, सर्वत्र जातनिहाय जनगणना व्हावी आणि ओबीसींच्या इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी सर्व ओबीसी संघटनांच्यावतीने समन्वय समितीचे संयोजक महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शहर पोलीस ठाण्याकडे परवानगी आणि मोर्चाला पोलीस संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केला होता. पण पोलीस निरीक्षक डी. डब्ल्यू. मंडलवार यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश यांचा संदर्भ देत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून या मोर्चाला परवानगी नाकारत असल्याचे कळवले.
या महामोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतूनच तसेच लगतच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्यामुळे प्रशासनाने अथक प्रयत्नाने नियंत्रणात आणलेली कोविड-१९ची साथ पुन्हा अनियंत्रित होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसात विविध कर्मचारी संघटनांचे गडचिरोली शहरात मोर्चे निघाले. त्यावेळी कोरोनाचे प्रमाण जास्त होते. आता हे प्रमाण बरेच आटोक्यात आले असतानाही मोर्चाला परवानगीच नाकारल्यामुळे आयोजकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता हा मोर्चा होणार किंवा नाही, याबाबत शंकेचे वातावरण निर्माण झाले असले तरी आयोजक मात्र महामोर्चा निघणारच, या भूमिकेवर ठाम आहेत. या मोर्चाला परवानगी मिळावी, यासाठी विविध पातळीवर प्रयत्नही केले जात आहेत.
ओबीसी महासंघाचे प्रा. शेषराव येलेकर यांच्यासह सर्व ओबीसी संघटनांचे पदाधिकारी मोर्चाच्या तयारीला लागले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वपक्षीय ओबीसी पदाधिकारी व संघटनांच्या बैठका सुरू आहेत. गडचिराेली जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमध्येही त्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. त्यामुळे या माेर्चाला सर्व स्तरातून पाठींबा वाढत आहे.
नेतेमंडळींसह मंत्रीही मोर्चासाठी येणार
दरम्यान, या महामोर्चाला आतापर्यंत अनेक संघटनांसह विविध राजकीय पक्ष, आदिवासी समाज संघटनांचे प्रतिनिधी, नेते यांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार अभिजीत वंजारी, आमदार परिणय फुके, आमदार संजय कुंटे, माजी आमदार अविनाश वारजूरकर आदींनी मोर्चाला पाठिंबा दर्शवत मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
आज संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक
पोलिसांनी महामोर्चाला परवानगी नाकारल्याने निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी रविवार, १४ रोजी ओबीसी समाज संघटनांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयात ही बैठक होणार असल्याचे जिल्हा समन्वय समितीकडून कळविण्यात आले आहे.