यावर्षी तरी नाल्यांचा उपसा हाेणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:35 AM2021-05-16T04:35:58+5:302021-05-16T04:35:58+5:30
काेरची : ग्रामीण भागातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती होत ...
काेरची : ग्रामीण भागातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. मागील वर्षी अनेक गांवामध्ये नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. यावर्षी तरी नाल्यांचा उपसा केला जाणार की नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित हाेत आहे.
दुग्ध संस्थांना आर्थिक मदती प्रतीक्षा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने हे शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्धव्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेक दुग्ध संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
नळाला तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डातील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत.
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
कमलापूर : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.
खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य
देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा.
अनुदानात वाढ करण्याची मागणी
कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.
अतिक्रमणाच्या विळख्यात आरमाेरी शहर
आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच खुल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम बांधले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, आंबेशिवणी, भिकारमौशी, राजगाटा, उसेगाव आदी गावांतील शेकडो नागरिक ये-जा करतात. मार्ग अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा होतो.
रेपनपल्ली-कमलापूर रस्ता उखडलेलाच
एटापल्ली : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन कि.मी.च्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुद्धा जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने आराखडा तयार करून रेपनपल्ली-कमलापूर मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
३३ केव्ही उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात
अहेरी : वन कायद्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणाला ३३ व ६६ केव्ही वीज उपकेंद्र उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. ही जागा घेण्यासाठी तेवढी एमपीव्ही रक्कम भरावी लागते. राज्य सरकार ती भरण्यास तयार नसल्याने काम रखडले आहे.
सिरोंचा तालुक्यातील बसथांब्यांची दुर्दशा
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाली असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण कायमच
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केव्हा हाेणार
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
भरधाव वाहनचालकांवर कारवाई नाही
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
मुद्रांक विक्रीत नागरिकांची लूट
गडचिरोली : विविध कामांसाठी लागणाऱ्या मुद्रांकांची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. १०० रुपये किमतीचे मुद्रांक ११०, ५०० रुपयांचे मुद्रांक ५१० रुपयांना विकले जात आहेत.
येवली येथे जलद बसला थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसला थांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्यांव्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी येथे जलद बसथांबा देण्याची मागणी होत आहे.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका
कुरखेडा : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे तक्रारही केली आहे. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
एटापल्ली : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यातून अवैध गुटखा विक्रीस आणला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आलापल्ली येथे बंधाऱ्याचे बांधकाम करा
आलापल्ली : परिसरातील गावांमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. गावात अल्प हातपंप सुरू असल्याने येथे नव्याने हातपंपही निर्माण करावेत, अशी मागणी आहे. या भागात सिंचन सुविधा ताेकड्या असल्याने याचा परिणाम दाेन्ही हंगामांतील विविध पिकांवर हाेत आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
मार्गावरील खांबामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
जिल्ह्यात माडिया भाषेत शिक्षणाची सोय करा
गडचिरोली : दुर्गम भागात माडिया भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षक व शाळा हा प्रवाह काही दिवसांपूर्वी पुढे आला होता. मात्र त्या शाळा सुरू झाल्या नाहीत. हिंदी व बंगालीप्रमाणे माडिया भाषेतून शिक्षणाची सोय करण्याची मागणी आहे.