प्रलंबित कामे खपवून घेणार नाहीे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:12 AM2017-11-02T00:12:15+5:302017-11-02T00:12:25+5:30
चामोर्शी तालुक्यात विविध प्रकारची विकास कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण व प्रलंबित स्थितीत आहेत. यामुळे आमसभेत झालेल्या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यात विविध प्रकारची विकास कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण व प्रलंबित स्थितीत आहेत. यामुळे आमसभेत झालेल्या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे चामोर्शी तालुक्यातील विकास कामे प्रलंबित राहता कामा नये, यापुढे तालुक्यातील प्रलंबित विकास कामे आपण खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा आ. डॉ. देवराव होळी यांनी दिला.
आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी पंचायत समितीची वार्षिक आमसभेची आढावा बैठक बुधवारी पार पडली. यावेळी आ. डॉ. होळी बोलत होते. या बैठकीला पं. स. सभापती आनंद भांडेकर, जि. प. सदस्य विद्या आभारे, पं. स. उपसभापती आकुली बिश्वास, संवर्ग विकास अधिकारी खामकर, तहसीलदार अरूण येरचे, पंचायत विस्तार अधिकारी भोगे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वीही आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी पंचायत समितीची आमसभा पार पडली होती. या सभेत अनेक लोकोपयोगी विकास कामांचे नियोजन करून मंजुरी प्रदान करण्यात आली होती. तसेच नागरिकांच्या समस्यांचे निवारणही करण्यात आले होते. त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र काही महिन्यांचा कालावधी उलटूनही मागील आमसभेत घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे चामोर्शी तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांना गती मिळावी तसेच झालेल्या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी, याकरिता आ. डॉ. देवराव होळी यांनी ही आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत तालुक्यातील अनेक नागरिकांनी रस्ते, वीज व इतर समस्या मांडल्या.