धानाला यावर्षी तरी बाेनस मिळणार का? हिवाळी अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

By गेापाल लाजुरकर | Published: November 29, 2022 10:30 AM2022-11-29T10:30:25+5:302022-11-29T10:34:11+5:30

बाेनससाठी आंदाेलन केले अन् सत्ता मिळताच मूग गिळून बसले

Will paddy get bonus this year? Attention of farmers towards the winter session | धानाला यावर्षी तरी बाेनस मिळणार का? हिवाळी अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

धानाला यावर्षी तरी बाेनस मिळणार का? हिवाळी अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

Next

गडचिराेली : धानाची शेती कसताना लागवड खर्च भरून निघत नाही. मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने राज्य शासनाकडून प्रतिक्विंटल बाेनस दिला हाेता; परंतु २०२१-२२ या हंगामातील बाेनस शेतकऱ्यांना मिळाला नाही, तसेच २०२२-२३ या वर्षांतही बाेनस मिळण्याची अनिश्चितता कायम आहे. विशेष म्हणजे, मार्च २०२२ मध्ये धान बाेनसच्या मागणीसाठी रस्त्यावर ‘आक्राेश’ करणारेच आता सत्तेत असताना मूग गिळून बसले आहेत काय? असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

धानाची शेती ताेट्यात जात असताना शेतकऱ्यांकडून याेग्य हमीभाव देण्याची मागणी सातत्याने केली जात हाेती; शेतकऱ्यांच्या मागणीची दखल शासनाने घेऊन २०१५-१६ पासून धानाच्या १४१० रुपयांच्या हमीभावावर २०० रुपये बाेनस जाहीर केला तेव्हापासून शेतकऱ्यांना धानावर बाेनस मिळू लागला. २०१७-१८ मध्ये ५०० रुपये बाेनस जाहीर झाला. त्यानंतर २०१९-२० पासून ७०० रुपये प्रतिक्विंटल बाेनस मिळण्यास सुरूवात झाली. २०२०-२१ पर्यंत बाेनस मिळाला; परंतु २०२१-२२ पासून बाेनस मिळणे बंद झाले. याच काळात महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना मार्च २०२२ मध्ये बोनसच्या मागणीला उचलून धरत तत्कालीन विराेधकांनी राज्यात ठिकठिकाणी ‘जनाक्राेश’ माेर्चे काढून मविआ सरकारचे लक्ष वेधले. विदर्भात धानाच्या बाेनसवर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले; परंतु तेच विराेधक आता सत्तारुढ झाले असताना बाेनसच्या मागणीसाठी आपण केलेल्या आंदाेलनाचा त्यांना विसर पडला की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

‘अ’ दर्जाचे धान हमीभावात का द्यावे?

हमीभाव धान खरेदी केंद्रांवर धान विक्री केल्यास ‘अ’ दर्जाच्या धानाला प्रतिक्विंटल २०६० रुपये तर साधारण धानाला २०४० रुपये चालू पणन हंगामात दिले जाणार आहेत. खुल्या बाजारात ‘अ’ दर्जाच्या नवीन धानाला सध्या २ हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. काही ठिकाणी हा दर २४०० रुपये प्रतिक्विंटल आहे. ‘अ’ दर्जाच्या जुन्या धानाला सध्या २ हजार ८०० ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. जर शेतकऱ्यांना हमीभावावर बाेनस मिळत नसेल तर त्यांनी ‘अ’ दर्जाचा धान हमीभाव केंद्रांवर का विक्री करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

धान उत्पादकांची अपेक्षा काय?

आगामी हिवाळी अधिवेशनातून शेतकऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत. २०२१-२२ मध्ये जाहीर न झालेले बाेनस शेतकऱ्यांना द्यावे, २०२२-२३ या हंगामासाठी शेतकऱ्यांना बाेनस घाेषित करावा. कापूस, साेयाबीनच्या तुलनेत धानाला अल्प हमीभाव मिळत असल्याने किमान १ हजार रुपये प्रतिक्विंटल बाेनस द्यावा तेव्हाच शेतकऱ्यांचा लागवड खर्च भरून निघेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

आठ वर्षांत असा वाढला हमीभाव व बाेनस

*वर्ष - हमीभाव - बाेनस*

  • २०१५-१६ - १४१० - २००
  • २०१६-१७ - १४७० - २००
  • २०१७-१८ - १५५० - ५००
  • २०१८-१९ - १७५० - ५००
  • २०१९-२० - १८१५ - ७००
  • २०२०-२१ - १८६८ - ७००
  • २०२१-२२ - १९४० -----
  • २०२२-२३ - २०४० -----

सध्या हमीभाव किती?

*पिके      :       हमीभाव (रुपये प्रतिक्विंटल)*

  • धान      :     २०४०-२०६०
  • कापूस  :      ६०८०-६३८०
  • साेयाबीन  :   ४३००
  • तूर          :   ६६००

Web Title: Will paddy get bonus this year? Attention of farmers towards the winter session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.