नवोदय विद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:52 PM2019-07-21T23:52:18+5:302019-07-21T23:53:28+5:30
गडचिरोली जिल्ह्यात केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असलेली चामोर्शी तालुक्याच्या घोट येथे एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. मात्र या शाळेच्या वनजमिनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. या प्रश्नासंदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गांभिर्याने दखल घेतली असून प्रत्यक्षात पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असलेली चामोर्शी तालुक्याच्या घोट येथे एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. मात्र या शाळेच्या वनजमिनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. या प्रश्नासंदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गांभिर्याने दखल घेतली असून प्रत्यक्षात पाहणी केली. त्यांच्या निर्देशानंतर येथे वन जमीन सर्वेक्षणाच्या कामास प्रारंभ झाला आहे.
घोट येथे नवोदय जवाहर विद्यालय झाल्याने गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर आले. तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी केंद्रीय विद्यालयाची संकल्पना मांडली. त्यांच्या पुढाकाराने एससी, एसटी व इतर मागास विद्यार्थ्यांसाठी घोट येथे १९८६-८७ या वर्षात जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. येथे इयत्ता सहा ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून सद्य:स्थितीत ४६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्व मिळून ४० कर्मचारी कार्यरत आहेत. सदर शाळेला वन जमीन मिळविण्यासाठी १० वर्षापूर्वी १ कोटी ३३ लाख रुपये भरण्यात आले होते. मात्र वनकायदा आड येत होता. परिणामी येथील बांधकामे थंडबस्त्यात राहिली. अलिकडेच सदर शाळेतील शिक्षक ओमप्रकाश साखरे व पालकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देऊन जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्यानंतर १५ जुलैला जिल्हाधिकारी सिंह यांनी सदर शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून जागेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर येथून सर्वे करणारे ३० कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी इमारत व रस्ता बांधकामाबाबत जागेचे सर्वेक्षण सुरू केले आहे.