राकाँचा ‘नवा गडी नवा राज’ यशस्वी होईल?

By Admin | Published: January 4, 2017 01:25 AM2017-01-04T01:25:09+5:302017-01-04T01:25:09+5:30

नगर परिषदेची निवडणूक पार पडताच राजकीय पक्षांचे लक्ष आता जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे.

Will Rakhao be successful in 'New Gadi Raja Raj'? | राकाँचा ‘नवा गडी नवा राज’ यशस्वी होईल?

राकाँचा ‘नवा गडी नवा राज’ यशस्वी होईल?

googlenewsNext

जिल्हा परिषद निवडणूक : राकाँची मदार तालुकाध्यक्ष सहारे यांच्यावर, राजकीय पक्षांतर्फे मोर्चेबांधणी सुरू
रत्नाकर बोमिडवार  चामोर्शी
नगर परिषदेची निवडणूक पार पडताच राजकीय पक्षांचे लक्ष आता जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चामोर्शी तालुकाध्यक्षपदी नुकतीच विवेक सहारे यांची निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा गडी नवा राज हा फार्मूला यशस्वी होईल काय, याकडे चामोर्शी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
चामोर्शी हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्यात सुमारे ९ जिल्हा परिषद क्षेत्र व १८ पंचायत समिती गण येतात. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या तालुक्याला विशेष महत्त्व असल्याने प्रत्येक राजकीय पक्ष या तालुक्याच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष देऊन राहतो. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने भेंडाळा येथे मोठा मेळावा घेऊन पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत यांचा पक्षात प्रवेश करून घेतला व निवडणुकीचे रणशिंग फुंकले. भाजपने मार्र्कं डादेव व चामोर्शी येथे सात कोटी रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्या तुलनेत बरीच मागे असल्याचे दिसून येते. गडचिरोली नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र चामोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस नाममात्र झाली असल्याचे सत्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नाकारता येणार नाही.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत अतुल गण्यारपवार यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. परंतु काही महिन्यातच अंतर्गत गटबाजीमुळे अतुल गण्यारपवार यांचा मोठा गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी झाली. नंतर प्रा. रमेश बारसागडे यांच्याकडे तालुकाध्यक्षपद देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न झाला. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर बारसागडे यांनी भाजपची वाट धरल्यामुळे चामोर्शी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आधारहीन व निर्जीव झाली. राष्ट्रवादी काँग्रेस नव्या गड्याचा शोध घेत असतानाच शिक्षण क्षेत्रातील युवा नेतृत्व विवेक सहारे यांचा शोध लागला. पदवीधर मतदार संघात बंडाखोरी होऊ नये म्हणून विवेक सहारे यांनाच मोहरा बनविण्यात आले. विवेक सहारे यांची चामोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात चांगली ओळख व संबंध आहेत. ते नव्या-जुन्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करतील व पदवीधर मतदार संघात बंडखोरी होणार नाही, अशी खेळी करीत राष्ट्रवादी काँग्रेसने विवेक सहारे यांना समोर केले.
चामोर्शी तालुक्यात भाजप व अपक्ष म्हणून जिल्हा परिषद बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी ९ जिल्हा परिषद क्षेत्रात विविध मेळावे घेऊन जय्यत तयारी सुरू केली आहे. काँग्रेस मात्र भेंडाळा क्षेत्राच्या पुढे सरकली दिसत नाही. तरीही काँग्रेसचे अनुभवी दिग्गज नेते सर्व क्षेत्राची मोर्चेबांधणी करण्याच्या कामाला लागले आहेत. काँग्रेसची प्रबळ व सक्षम उमेदवारांचा शोध घेताना चांगलीच दमछाक उडत आहे. शिवसेनेनेही तगडे उमेदवार रिंगणात उभे करून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या सर्व पक्षांच्या नियोजनाच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस बरीच मागे असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विवेक सहारे यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. त्यांचा नवा गडी नवा राज हा प्रयोग यशस्वी होईल काय, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मागील निवडणुकीत भाजपचे ५, अतुल गण्यारपवार यांच्या मदतीने राकाँचे ३ व एका अपक्षाने बाजी मारली होती. यावेळी देखील भाजपा व अतुल गण्यारपवार यांच्या आघाडीने जोरदार मुसंडी घेत तयारी चालविली आहे. काँग्रेस देखील मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारीत आहे. भाजप व काँग्रेस पक्षाचे नेते व अतुल गण्यारपवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. या मुरब्बी राजकीय खेळाडूंसमोर राकाँचा कमी अनुभवी नवा गडी राजकीय सारीपाठावर आपला डाव मांडून तो जिंकू शकेल काय, याकडे लक्ष लागले आहे.

भाजपला रोखण्यासाठी आघाडी आवश्यक
काँग्रेसने अतुल गण्यारपवार यांच्यासोबत जुळवून घेत एकत्रितपणे निवडणूक लढल्यास भाजपच्या विजयी रथाला लगाम घालणे शक्य होऊ शकते. मात्र काँग्रेस अतुल गण्यारपवार यांच्या अपक्ष आघाडीसोबत युती करणार काय, हाही मोठा प्रश्न आहे. मात्र भाजपला थांबविण्यासाठी हा कटू निर्णय काँग्रेसला घेणे कधीही फायद्याचे ठरेल, असा अंदाज राजकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
 

Web Title: Will Rakhao be successful in 'New Gadi Raja Raj'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.