क्रांतीकारी गुंडाधूरचे स्वप्न जिल्ह्यात पूर्णत्वास येणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:32 AM2019-02-10T01:32:47+5:302019-02-10T01:35:19+5:30
छत्तीसगड राज्यातल्या बस्तर जिल्ह्यात आदिवासींचे आदर्श क्रांतीकारी जमीनदार गुंडाधूर यांनी आपल्या समाजबांधवांवर (आदिवासींवर) इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध १९१० मध्ये बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगड राज्यातल्या बस्तर जिल्ह्यात आदिवासींचे आदर्श क्रांतीकारी जमीनदार गुंडाधूर यांनी आपल्या समाजबांधवांवर (आदिवासींवर) इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध १९१० मध्ये बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले होते. बस्तरमधील तो भूमकाल विद्रोह सतत ७५ दिवस चालू होता. त्या विद्रोहाची सुरूवात १० फेब्रुवारीला झाली होती. आजही आदिवासींवरील अत्याचार सुरूच आहेत. फक्त अत्याचार करणारे बदलले आहेत. रविवारच्या भूमकाल दिनाच्या निमित्ताने आदिवासींवरील अत्याचाराविरूद्ध पुन्हा एकदा आवाज उठविण्यासाठी आणि क्रांतीकारी गुंडाधूरने बघितलेले आदिवासींच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कोणी पुढाकार घेईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
आजपासून १०९ वर्षांपूर्वी गुंडाधूर यांनी आपल्या आदिवासी बांधवांवर होणाºया अत्याचाराविरूद्ध १० फेब्रुवारी १९१० रोजी पहिला आवाज उठविला होता. त्यांनी आदिवासींना सोबत घेऊन इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला. त्यावेळी कोणताही विद्रोह शांत करण्यास इंग्रजांना फारसा वेळ लागत नव्हता. परंतू बस्तरमधील भूमकाल विद्रोह हा सतत ७५ दिवस चालू होता. इंग्रजांनी ५०० बंदूकधारी पाठवूनसुद्धा विद्रोह शांत होत नव्हता. १६ फेब्रुवारी ते ३ मे १९१० पर्यंत विद्रोह शांत करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर इंग्रजांनी निर्दोष आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू केले. नेतानार जवळील अलनारच्या जंगलात २१ आदिवासींना पकडून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. यामुळे आदिवासी व गुंडाधूर यांनी चिडून जाऊन इंग्रजांवर हल्ला केला. यात अनेक इंग्रज आणि आदिवासीही मारले गेले. पण गुंडाधूर हा इंग्रजांच्या हाती लागला नाही किंवा गुंडाधूर हा कोण हे इंग्रजांना समजले नाही.
आदिवासींना सुखी, समाधानी जीवन जगायला मिळावे म्हणून ते स्वप्न क्रांतीकारी गुंडाधूरने पाहिले होते ते स्वप्न आजही अधुरेच आहे. इंग्रजांची जागी आज नक्षलवाद्यांनी घेतली आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाची प्रगती खुंटली आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणाला विरोध, नोकरी, रोजगाराला विरोध, गावात होणाºया रस्ते बांधकाम, शासकीय कार्यालयांना विरोध, शासनस्तरावरून आदिवासींना मिळणाºया सोयीसुविधांना विरोध, आणि महत्वाचे म्हणजे समाजाच्या विकासासाठी धडपड करणाºया आदिवासींना खबरी ठरवून त्यांच्या हत्या करणे अशा हिंसक घटना घडवून नक्षलवादी आदिवासींच्या प्रगतीमधील मोठा अडथळा ठरत आहेत.
आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी २० दिवसांत ८ आदिवासी नागरिकांनी हत्या केली. कसनासूरच्या नागरिकांना त्यांच्याच गावातून बेघर करण्यात आले. शेवटी त्यांना ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला यावे लागले. जिल्ह्यातील आदिवासी समाजावरील या अत्याचाराविरूद्ध बंड पुकारण्यासाठी भूमकाल दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाने एकजूटता दाखवून गुंडाधूरचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.