आरोग्यविषयक समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 01:00 AM2018-04-02T01:00:35+5:302018-04-02T01:00:35+5:30
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व स्वास्थ्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची बहुसंख्य पदे रिक्त असल्याने स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून आरोगयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व स्वास्थ्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची बहुसंख्य पदे रिक्त असल्याने स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून आरोगयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी दिले.
आम्ही आमच्या आरोग्यासाठी, इंडियन इन्स्टिट्युट आॅफ यूथ वेलफेअर, साथी पुणे व राष्टÑीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जि. प. सदस्य अॅड. राम मेश्राम, मनीषा दोनाडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, पं. स. सदस्य अशोक खेवले, भाऊसाहेब अहेर उपस्थित होते.
शुभदा देशमुख यांनी आरोग्य सेवांवर लोकाधारीत देखरेख व नियोजन प्रक्रियेची मांडणी केली. रिक्त पदे, रूग्णांना मिळणारी अपुरी सेवा, आरोग्य यंत्रणेला भेडसावणाऱ्या समस्या, औषधांचा तुटवडा, उपकेंद्र व प्रा. आ. केंद्र गळती, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, उपकेंद्र व अंगणवाडी केंद्रांचे नवीन बांधकाम करण्याचे प्रस्ताव, १०८ रूग्णवाहिकेविषयी अडचणी मांडण्यात आल्या. यासोबतच आरोग्य सेवांवर लोकाधारीत देखरेख व नियोजन प्रक्रिया नागरिकात रूजविण्यासाठी ग्राम आरोग्य, पाणीपुरवठा, पोषण व स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात आला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी औषधांचा तुटवडा ही समस्या राज्यस्तरावरून असल्यामुळे डी. पी. डी. सी. च्या निधीतून औषध खरेदी करून जिल्ह्यात वितरित करण्यात येत असल्याचे सांगत रिक्त पदांसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी लामतुरे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन यशवंत पाठणकर, प्रास्ताविक मनोहर हेपट तर आभार जैनूल शेख यांनी मानले.