तीन महिन्यांत सव्वा दोन हजारांवर शौचालयांचे बांधकाम होईल का पूर्ण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:25 IST2024-12-25T15:25:00+5:302024-12-25T15:25:38+5:30
रेती मिळेना, साहित्यही महागले : ३१ मार्चची डेडलाईन; लाभार्थ्यांची होतेय दमछाक

Will the construction of over two and a half thousand toilets be completed in three months?
दिलीप दहेलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत सन २०२४- २५ या आर्थिक वर्षातबाराही तालुक्यात मिळून एकूण ४ हजार वैयक्तीक शैचालयाचे काम मंजूर करण्यात आले. मात्र, आतापर्यंत निम्यापेक्षा कमी शौचालयाचे काम पूर्ण झाले असून अजूनही सव्वा दोन शौचालयांचे काम अपूर्ण आहे. येत्या तीन महिन्यांत या सर्व शौचालयांचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.
काही ठिकाणी अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतरही लाभार्थ्यांनी बांधकामास सुरुवात केलेली नाही. याला रेती व इतर बांधकाम साहित्याची अडचण कारणीभूत असल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी येत्या ३० मार्चपर्यंत शौचालयांचे काम पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विहीत वेळेत शहरी व ग्रामीण भागातील शौचालये पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना केल्या आहे. संबंधित ग्रामसेवकांनी आपल्या गावातील वैयक्तिक शौचालयाचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना बिडीओंनी दिल्या आहेत. महिन्यातून दोनदा सभा बोलावून शौचालय बांधकामाचा आढावा अधिकारी घेत असल्याचे दिसून येत आहे.
असा आहे शौचालय बांधकामाचा तपशील
तालुका मंजूर शौचालये पूर्ण कामे अपूर्ण कामे
अहेरी ५६८ २३८ ३३०
आरमोरी ३५४ १३३ २२१
भामरागड ५२९ १२२ ४०७
चामोर्शी ३९८ २८७ १११
देसाईगंज २०४ १०२ १०२
धानोरा १६२ ६५ ९७
एटापल्ली २०१ ८१ १२०
गडचिरोली 333 २१० १२३
कोरची २१४ ७२ १४२
कुरखेडा १९६ ९१ १०५
मुलचेरा ३४२ १८० १६२
सिरोंचा ६६३ २४९ ४१४
सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष
हागणदारी मुक्त शहर व गाव हा दर्जा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. हा दर्जा टिकवण्यासाठी सार्वजनिक शौचालयांची देखभाल करणे अनिवार्य आहे. या शौचालयांत वीज व पाणीपुरवठा करणे, दरवाजे, शौचकुपे व्यवस्थित असणे आवश्यक आहे. त्यानुसार या शौचालयांची देखभाल दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. गडचिरोली शहरातही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे प्रशासनाकडून आता काय कार्यवाही केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अहेरी, भामरागड तालुका माघारला
स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत अहेरी उपविभागातही शौचालयांची कामे बरीच मंजूर करण्यात आली. मात्र, या भागातील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे या उपविभागात शौंचालयांच्या कामांना वेग नाही. अहेरी व भामरागड हे दोन तालुके शौचालय बांधकामात माघारले आहेत. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ४०७ आणि अहेरी तालुक्यात ३३० शौचालयांचे काम अपूर्ण आहेत.