मानव-वन्यजीव संघर्षात व्यापणार का संपूर्ण जिल्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 11:23 PM2022-11-17T23:23:07+5:302022-11-17T23:24:05+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही.
गोपाल लाजुरकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात जानेवारी २०१९ पासून मानव-वन्यजीव संघर्षाला जोरदार सुरुवात झाली. याच महिन्यात जिल्ह्यातील पहिला बळी वाघाने घेतला. त्यानंतर गेल्या ४ वर्षांत आतापर्यंत म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाघांनी ४३ तर, बिबट्यांची ५ लोकांचा बळी घेतला. यात गडचिरोली तालुक्यातील सर्वाधिक २५ लोकांचा समावेश आहे. हे हल्ले केवळ गडचिराेली व वडसा वनविभागातच झाले नाही तर बिबट्यांनी आलापल्ली, सिराेंचा वनविभागातही लाेकांचा बळी घेतला. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षात संपूर्ण जिल्हा व्यापणार काय, असा प्रश्न आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही. अशा प्रकारच्या घटना क्वचितच घडल्या असाव्यात. गत चार वर्षांपासून सुरू झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षानंतर वाघांचा वावर असलेल्या गावांमध्ये रोजंदारीवर देखरेख व कृती पथक गठित करण्यात आले. वन विभागातर्फे सदर पथक लोकांमध्ये जागृती करीत आहे; परंतु वाघांचे हल्ले व बळी जाण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. काही घटना जंगलात तर काही घटना अगदी शेतात व शेतशिवारात घडल्या. यातच देसाईगंज व भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील १३ लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाला वन विभागाने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी जेरबंद केले.
ती वाघिण केव्हा हाेणार जेरबंद?
गडचिरोली तालुक्यातील ७ लोकांचा बळी घेणारी टी-६ वाघीण अद्याप जेरबंद झाली नाही. ३० नोव्हेंबरपर्यंत सदर वाघिणीला जेरबंद करण्याचे वन विभागापुढे आव्हान आहे. हल्लेखोर वाघ वेळीच जेरबंद न झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अस्वलांनीही घेतले अनेक बळी
गडचिराेली जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची जेवढी दहशत आहे, तेवढीच दहशत अस्वलांचीही आहे.
जिल्ह्यातील सर्वच वन विभागात अस्वलांचा वावर आहे; परंतु जीवितहानीच्या घटना भामरागड, आलापल्ली व सिराेंचा वनविभागात अधिक घडल्या आहे.
दरवर्षी तेंदूपत्ता हंगामात हे हल्ले हाेतात. २२ जून २०२२ राेजी एटापल्ली तालुक्यातील बटेर येथील एका नागरिकाला अस्वलाने ठार केले हाेते.
विशेषत: चामाेर्शी, मुलचेरा, काेरची, आरमाेरी तालुक्यात अस्वलांचे हल्ले झाले असून त्यात अनेकजण जखमी झाले.
आलापल्ली वन विभागात शिकारीचा धाेका
गडचिराेली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या सर्वाधिक शिकारी आलापल्ली वन विभागात झाल्या आहेत. वन विभागाच्या कारवाईवरून हे प्रकार उघडकीसही आले आहेत. विद्युत प्रवाह तसेच फासे लावून ही शिकार केली जाते. यापासून वाघ, बिबट तसेच चितळ, सांबर व रानटी डुकरेसुद्धा सुटली नाहीत.