महिनाभरात ४४५ मिमी पाऊस पडणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:15+5:302021-09-02T05:18:15+5:30
गडचिराेली : १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत गडचिराेली जिल्ह्यात सरासरी १२५४.१ मिमी पाऊस पडतो. या वर्षी १ ...
गडचिराेली : १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत गडचिराेली जिल्ह्यात सरासरी १२५४.१ मिमी पाऊस पडतो. या वर्षी १ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत केवळ ८०९.१ मिमी पाऊस पडला आहे. दरवर्षीच्या वार्षिक सरासरी गाठण्यासाठी सप्टेंबर या एका महिन्यात ४४५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. एवढा पाऊस पडणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला हाेता. मात्र मागील तीन महिन्यांमधील पावसाची स्थिती लक्षात घेतली तर हवामान खात्याचा अंदाज खाेटा ठरला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही भागांत अजूनही जेमतेम ५० टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे तलाव, बाेड्या अर्धवटच भरल्या असल्याचे दिसून येत आहे.
काही भागांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने धानाचे राेवणे झाले नव्हते. आता दाेन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राेवणे सुरू केले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी जमीन पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बाॅक्स...
केवळ ७६ टक्केच पाऊस
१ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १०६५.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र केवळ ८०९.१ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. तीन महिन्यांच्या सरासरीच्या केवळ ७५.९ टक्केच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला नाही. काही तालुक्यांमध्ये तर केवळ ७० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.
बाॅक्स...
एकही नदी दुथडी वाहिली नाही
ऑगस्ट महिन्यात दरवर्षी गडचिराेली जिल्ह्याला पुराचा फटका बसतो. मात्र या वर्षी पाऊस कमी झाल्याने एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही. नदी, नाल्यांमध्येसुद्धा पुरेसे पाणी नाही. दाेन दिवसांपूर्वी जिल्ह्यात कडक ऊन पडत हाेते. त्यामुळे धानपिकाला माेटारपंपाचे पाणी द्यावे लागत हाेते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत हाेते.