आत्मसमर्पितांना नाेकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:25 AM2021-06-24T04:25:10+5:302021-06-24T04:25:10+5:30
गडचिराेली : आत्मसमर्पितांसाठी नवजीवन वसाहत निर्माण करण्यात आली असून येथे विद्युतीकरण व पाणीसुविधा करण्यात येणार आहे. याशिवाय, येथील आत्मसमर्पितांना ...
गडचिराेली : आत्मसमर्पितांसाठी नवजीवन वसाहत निर्माण करण्यात आली असून येथे विद्युतीकरण व पाणीसुविधा करण्यात येणार आहे. याशिवाय, येथील आत्मसमर्पितांना नाेकरी मिळवून देण्यासाठी पाेलीस विभाग प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी दिली.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी शासनाच्या पुढाकाराने पाेलीस विभागाच्या वतीने गडचिराेली येथे कॉम्प्लेक्स परिसरात नवजीवन वसाहत निर्माण करण्यात आली आहे. २३ जून राेजी बुधवारला जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांच्या हस्ते या नवजीवन वसाहत फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच परिसरात वृक्षाराेपण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बाेलत हाेते.
याप्रसंगी प्रामुख्याने अपर पाेलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पाेलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे आदी उपस्थित हाेते. आत्मसमर्पितांना शिवणकाम, माेटार ड्रायव्हिंग, गवंडी काम आदींचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यात येणार आहे. विकासकामात आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पाेलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे, असे पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी सांगितले. जे नक्षलवादी विकासाच्या प्रवाहात सामील हाेण्यास इच्छुक आहेत, त्यांना लाेकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिराेली पाेलीस दल सर्वताेपरी मदत करणार, असे आश्वासन पाेलीस अधीक्षक गाेयल यांनी दिले. याप्रसंगी आत्मसमर्पण केलेल्या शशिकला ऊर्फ गुनी हिचा पाेलीस अधीक्षकांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला पाेलीस विभागाचे कर्मचारी व जवान उपस्थित हाेते.