वैरागड व कढोली बंधारे पूर्ण होणार काय?
By admin | Published: November 3, 2014 11:26 PM2014-11-03T23:26:03+5:302014-11-03T23:26:03+5:30
कढोली व वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याचे बांधकाम अपूर्ण राहीले आहे. नवीन सरकारने सदर बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
वैरागड : कढोली व वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याचे बांधकाम अपूर्ण राहीले आहे. नवीन सरकारने सदर बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
कढोलीजवळून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात मोठ्या पुलाच्या खालील भागात २००८-०९ या आर्थिक वर्षात शिवकालीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत बंधारा निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर २००९- १० या आर्थिक वर्षात वैरागड येथील पाणी पुरवठा विहीरीच्या खालील भागात शिवकालीन बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र या दोनही बंधाऱ्यांचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर बांधकाम अपूरे असल्याने पुरेसे पाणी साचून राहत नाही. बंधाऱ्याची उंची केवळ ३ फुट असल्याने बरेचशे पाणी बंधाऱ्यावरून वाहून जाते. बंधाऱ्यामुळे काही प्रमाणात नेहमीच पाणी साचून राहत असल्याने नदीपात्राच्या दोनही किनाऱ्यांवर दगडांची पिचिंग करणे आवश्यक होते. मात्र हे बांधकाम झाले नसल्याने नदीपात्र खचत चालला आहे. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस विस्तारत चालले असून यामुळे सभोवतालची शेती धोक्यात आली आहे.
शिवकालीन बंधाऱ्यांचा मुख्य उद्देश नदी- नाल्यामधून वाहून जाणारे पाणी अडवून सभोवतालच्या परिसरातील भूजलाच्या पातळीत वाढ करणे हा आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासू नये यासाठी या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र चुकीचे नियोजनामुळे बंधारे बांधकामाचा उद्देश सफल झाला नाही. त्यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामावर झालेला लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे.
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. नवीन सरकारकडून या बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.