नागरिकांचा विश्वास कायमसाठी जिंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:45 AM2017-08-06T00:45:06+5:302017-08-06T00:45:26+5:30
गेल्या ३५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून गडचिरोली जिल्हा नक्षलवादाची झळ सहन करीत आहे. कायम दहशतीत वावरणाºया या जिल्ह्यात यावर्षी मात्र नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहातील....
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या ३५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून गडचिरोली जिल्हा नक्षलवादाची झळ सहन करीत आहे. कायम दहशतीत वावरणाºया या जिल्ह्यात यावर्षी मात्र नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहातील सात दिवसात कोणतीही हिंसक किंवा अप्रिय घटना घडली नाही. पोलिसांनी नागरिकांच्या जागृतीसाठी जे-जे काही उपक्रम राबविले त्यात नागरिकांनी चांगले सहकार्य केले. पोलीस नागरिकांचा विश्वास जिंकण्यात बºयाच अंशी यशस्वी झाले असाच त्याचा अर्थ काढता येईल. खरे तर त्यासाठी सर्व तरुण पोलीस अधिकारी आणि प्रत्यक्ष बंदूक हाती घेऊन जंगलात गस्त घालणारे तमाम पोलीस कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.
केवळ नक्षल कारवायांना प्रतिबंध घातला म्हणजे पोलीस ही लढाई जिंकले असे होत नाही. मुळात ज्यांच्यासाठी ही लढाई सुरू आहे त्या आदिवासी नागरिकांचा विश्वास जिंकण्यात पोलिसांची खरी जीत आहे. जे आदिवासी लोक आजवर नक्षलवाद्यांनाच नाही तर पोलिसांनाही घाबरत होते त्यांना आज पोलीस जवळचे वाटू लागले आहेत. केवळ दंडूकेशाहीचा धाक दाखवून सर्वकाही साध्य होत नाही. आजपर्यंत पोलीस हेच करत आले आणि म्हणूनच नागरिक-पोलीस संबंध फारसे चांगले नव्हते. परिणामी नक्षल चळवळ अधिक फोफावली. मात्र उशिरा का होईना, याचा अभ्यास पोलिसांनी केला. जुन्या चुका सुधारून वेगळ्या पद्धतीने नागरिकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आणि म्हणूनच नक्षल कारवाया रोखण्यात त्यांना यश मिळत आहे.
गावात एखाद्याच्या घरी नक्षलवादी आले किंवा त्यांना ग्रामस्थाने जेवण दिले म्हणजे ती व्यक्ती नक्षल समर्थक होत नाही. जीवाच्या भितीने ती व्यक्ती इच्छा नसूनही काही गोष्टी करीत असते. पण त्या व्यक्तीच्या मनस्थितीचा काहीही विचार न करता पोलीस अपराध्याच्या नजरेतून त्या ग्रामस्थाकडे पाहतात. एकीकडे पोलीस खबºया असल्याच्या संशयातून नक्षल्यांचा रोष सहन करायचा, तर दुसरीकडे नक्षल समर्थक असल्याच्या संशयातून पोलिसांचे दंडुके खायचे, हेच वर्षानुवर्षे होत आले. त्या निरपराध आणि असहाय आदिवासी व्यक्तीच्या त्याच्या जागी स्वत:ला ठेवून त्याच्यावर काय प्रसंग बितत असेल याचा विचार निदान पोलिसांनी तरी करायलाच हवा. अलिकडे हे चित्र हळूहळू बदलत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक बदल होत आहे. पोलिसांनी केवळ नक्षल सप्ताहापुरती नागरिकांशी जवळीकता न ठेवता कायमसाठी त्यांच्याबद्दल ‘मित्रत्वा’ची भावना ठेवावी लागणार आहे.
आज नागरिकांना विविध पातळींवर मदत करण्यासोबतच रस्ता दुरूस्तीसारखी इतर विभागांची कामेही पोलीस करताना दिसत आहेत. नक्षल्यांशी लढताना गोळीचे उत्तर गोळीने द्यावे लागत असले तरी नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी पोलिसांनी मदतीचा हात कायम पुढे ठेवल्यास आदिवासी नागरिकही त्यांचा हात पोलिसांच्या हाती दिल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांचा हा विश्वास पोलिसांनी कायमसाठी टिकविणे आणि पोलीस-नागरिक संबंध अधिक दृढ करणे हाच नक्षलवाद नियंत्रणाचा सोपा मार्ग ठरणार आहे.