ग्राहकांचा विश्वास जिंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:09 AM2018-02-25T00:09:13+5:302018-02-25T00:09:13+5:30
पतसंस्थांच्या प्रगतीसाठी संचालकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. नवनवीन तंत्रज्ञान व ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच विदर्भातील सहकारी पतसंस्थांची चळवळ आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे उभी आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : पतसंस्थांच्या प्रगतीसाठी संचालकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. नवनवीन तंत्रज्ञान व ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच विदर्भातील सहकारी पतसंस्थांची चळवळ आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे उभी आहे. असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.
गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था संघ मर्यादित गडचिरोलीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या सभागृहात आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन २३ ते २५ फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रंचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य खुशालराव वाघरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जगदीश किल्लोळ, माजी प्राचार्य धनंजयराव गाडगीळ, सहकारी पतसंस्था संघाचे उपाध्यक्ष एस. व्ही. दुमपट्टीवार, मानद सचिव प्रा. शेषराव येलेकर उपस्थित होते.
प्रंचित पोरेड्डीवार पुढे म्हणाले विदर्भात आज १०० कोटी पासून ते ५००० कोटी पर्यंत वार्षिक उलाढाल करणाºया पतसंस्था आहेत. त्याचा फायदा विदर्भातील जनतेला मोठ्या प्रमाणात होत आहे.
अध्यक्षपदावरून बोलतांना खुशाल वाघरे म्हणाले सहकारासाठी संस्काराची म्हणजेच प्रशिक्षणाची गरज आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून सहकारी कार्य व त्यांचे संस्कार होण्याची संधी प्राप्त होते. त्यातून आपणास व आपल्या पतसंस्था बळकट करण्यात मदत होते. पतसंस्थांनी अधिक पारदर्शकपणे काम करून आपल्या पतसंस्था बळकट कराव्यात असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सहकारी पतसंस्था संघाचे व्यवस्थापक बी. एम. नागापूरे, प्रास्ताविक प्रा. शेषराव येलेकर तर आभार एस. व्ही. दुमट्टीवार यांनी मानले.
कार्यक्रमाला जिल्हाभरातून विविध पतसंस्थांचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. २५ फेब्रुवारी रोजी उत्कृष्ठ सहकारी पतसंस्था जिल्हा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.