वादळी पावसाने घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:51 PM2019-04-20T23:51:13+5:302019-04-20T23:51:53+5:30
चामोर्शी तालुक्यातील आष्टी, चपराळा परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी, चपराळा परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले. परिणामी या भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडित होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.
आष्टी परिसरात शुक्रवारी ३ वाजतापासून अचानक वादळ आले. वादळवाऱ्यासह पावसालाही सुरूवात झाली. या परिसरात कुनघाडा, ठाकरी, चपराळा, चौडमपल्ली, मार्र्कं डा (कं.) आदी गावातील अनेक नागरिकांच्या घराच्या कवेलू उडाल्या. तसेच टिनपत्रे उडाले. कवेलू घर परिसरात पडल्याने ते फुटले. याशिवाय घराच्या छतावरील फाटेही अस्ताव्यस्त झाले. काही ठिकाणी विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित होता. दुसºया दिवशी विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उशिरापर्यंत वीज दुरूस्तीचे काम सुरूकेले. परंतु एका दिवसाचे हे काम नसल्याने नागरिकांना दुसºया दिवशीही रात्र अंधारातच काढावी लागली.
चपराळा येथील काही नागरिकांच्या घरावरील कवेलू वादळवाºयाने उडाले. तसेच टिनपत्रे खाली कोसळले. सिमेंट पत्रे उडून खाली पडून फुटले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. वादळीवाºयासह पाऊस आल्याने अनेक नागरिकांच्या मातीच्या घराच्या भिंती कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना रात्रभर प्रचंड त्रास सहन करावा लागला. या भागात अनेक शेतकºयांच्या आंबा पिकाचे नुकसान झाले. सध्या आंब्यात कठीण कोई निर्माण होण्याचा कालावधी आहे. याच कालावधीत अनेक नागरिक आंब्याचे लोणचे टाकतात. परंतु वादळवाºयाने बहुतांश झाडावरील निम्म्यापेक्षा अधिक आंबे खाली गळून प्रचंड नुकसान झाले. चपराळा येथील मनोहर आदे, पत्रू निकोडे, कल्पना मेश्राम, ईश्वर आदे यांच्या घरावरील कवेलू तसेच टिन वादळाने उडाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाचा जोरदार फटका या परिसराला बसला.
पंचनामे करण्याची मागणी
आष्टी परिसरातील आठ ते दहा गावाला शुक्रवारच्या वादळी पावसाचा जोरदार फटका बसला. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाली. मातीच्या भिंतीही कोसळल्या. त्यामुळे महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे झोपडीवजा घरे असलेल्या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. गवताच्या झोपड्यांवरील गवत वादळाने उडाले. नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई के व्हा मिळेल, याची प्रतीक्षा आहे.