आष्टीत वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:08 AM2018-04-23T00:08:05+5:302018-04-23T00:08:05+5:30
चामोर्शी तालुक्याच्या आष्टी, अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस बरसला. विद्युत तारा तुटल्याने या दोन्ही परिसरातील वीज पुरवठा सायंकाळपासून खंडीत झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी/कमलापूर : चामोर्शी तालुक्याच्या आष्टी, अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस बरसला. विद्युत तारा तुटल्याने या दोन्ही परिसरातील वीज पुरवठा सायंकाळपासून खंडीत झाल्याची माहिती आहे.
आष्टी येथे सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जोरात वादळ सुरू होऊन पावसाला सुरूवात झाली. वादळामुळे काही हॉटेलचे छत उडून गेले. या भागातील रात्री एका इसमाचे घर कोसळल्याची माहिती आहे. वादळामुळे विद्युत तारा तुटून सायंकाळी ६ वाजतापासून आष्टी शहर व परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती आहे. अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातही सायंकाळी ५ वाजतापासून वादळी पाऊस सुरू झाला. गावाशेजारील झाडांच्या फांद्या विद्युत तारावर कोसळल्या. सदर तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे या भागातील १५ ते २० गावे अंधारात सापडली. अहेरी उपविभागाच्या इतर भागातही काही प्रमाणात वादळी पाऊस बरसला. गडचिरोली शहरासह तालुक्यात सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला होता. मात्र पाऊस बरसला नाही.
आष्टी येथे वादळी पावसाने दिलीप कर्डेवार यांच्या घराची भिंत कोसळली. तसेच अनिता कांबळे यांच्या हॉटेलवरील छत उडाले. कर्डेवार यांनी सदर नुकसानीची माहिती सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटलांना दिली. मात्र कोणीही त्यांच्या कोसळलेल्या घराची पाहणी प्रत्यक्ष येऊन केली नाही, असा आरोप दिलीप कर्डेवार यांनी केला आहे.
भिंत कोसळल्यामुळे दिलीप कर्डेवार यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने तत्काळ पंचनामा करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी, अशी मागणी कर्डेवार यांनी केली आहे.