मतदारांनी विकासाला दिलेला कौल आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:48 AM2019-05-24T00:48:15+5:302019-05-24T00:50:04+5:30
लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत.
मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत.
प्रश्न : हा विजय अपेक्षित होता का?
उत्तर : १०० टक्के अपेक्षितच होता. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने राबविलेले चांगले धोरण, कल्याणकारी योजना आणि या मतदार संघासाठी गेल्या पाच वर्षात केलेली कामे यामुळे मतदार आपल्यालाच कौल देतील याची खात्री होती.
हा कौल तुमच्या विकासात्मक कामांना की मोदींना?
दोन्हींना आहे. या मतदार संघात झालेले राष्ट्रीय महामार्ग, पूल, रेल्वेमार्गाची मंजुरी, वैनगंगा नदीवरील पाच बॅरेज या प्रमुख कामांचा प्रभाव होता. शिवाय पंतप्रधान मोदींची सुप्त लाटही होती. दोन्ही गोष्टींमुळे विजय सुकर झाला.
निवडणूक काळातील अपप्रचाराचा परिणाम झाला नाही?
माझ्या बाबतीत विविध मार्गाने अपप्रचार करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण मतदार त्याला बळी पडले नाही. गेल्या ६०-७० वर्षात ज्यांनी देशावर राज्य केले त्यांनी किती लुटले हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला बहुमत दिले.
पुढील पाच वर्षात कोणत्या कामांना प्राधान्य देणार?
या जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधांअभावी उद्योगधंदे येत नाही. या सोयी पूर्ण करून रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करायचे आहे. शिवाय सिंचन, आरोग्यासह नवीन योजना येतील.