दीड वर्षातच बंधारा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:15 AM2018-07-13T00:15:52+5:302018-07-13T00:16:32+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय धानोरा (उत्तर) यांच्या मार्फत दीड वर्षापूर्वी कंपार्ट नं. ५५३ मध्ये चिचोली लगत बांधलेला बंधारा अल्पावधीतच फुटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय धानोरा (उत्तर) यांच्या मार्फत दीड वर्षापूर्वी कंपार्ट नं. ५५३ मध्ये चिचोली लगत बांधलेला बंधारा अल्पावधीतच फुटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. बंधारा बांधकाम दर्जाबाबत शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी (उत्तर) धानोराच्या यंत्रणेव्दारे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमधून २०१६ मध्ये बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधकामात लोकल गिट्टी व निकृष्ट साहित्य वापरण्यात आले. त्यामुळे दीड वर्षातच बंधारा वाहून गेल्याने येथे पाणी न अडता वाहून जात आहे. पावसाळ्यातील पाण्याची अडवणूक होऊन त्याचा उपयोग शेतीला व्हावा, तसेच अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. ८.८० लाख रूपयांचा निधी बंधारा बांधकामासाठी मंजूर झाला. बंधारा बांधकामासाठी ७.६१ लाख रूपयांचा खर्च करून आॅक्टोबर २०१६ मध्ये सदर बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु अल्पावधीतच या बंधाऱ्याची दुर्दशा झाल्याने बंधाऱ्याच्या बांधकाम दर्जावर शेतकऱ्यानी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. सध्या पुराचे पाणी वाहून जात आहे. येथे पाणी राहणार की नाही अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.