नक्षल चळवळीत येण्यासाठी प्रवृत्त करणा-या महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 08:47 PM2018-06-26T20:47:31+5:302018-06-26T20:47:45+5:30
बक-या चारण्यासाठी जाणा-या एका विवाहित महिलेला आणि एका अल्पवयीन मुलीला नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून नेणा-या महिलेला पोलिसांनी अटक केली
गडचिरोली - बक-या चारण्यासाठी जाणा-या एका विवाहित महिलेला आणि एका अल्पवयीन मुलीला नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून नेणा-या महिलेला पोलिसांनी अटक केली. तसेच तिच्यासोबत जात असलेली महिला व मुलीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील नारगुंडा येथील रहिवासी असलेली रुकमी लालू नरोटी (३२) ही महिला एटापल्ली लगतच्या एटापल्ली टोला येथे आपल्या नातेवाईकांकडे एक महिन्यापासून राहात होती. काही दिवसांपासून तिने बकºया चारण्यासाठी जाणाºया महिला व मुलींशी मैत्री करून त्यांना नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले. दरम्यान दि.२३ रोजी एटापल्लीतील एक २० वर्षीय विवाहित महिला आणि एटापल्ली टोला येथील १४ वर्षीय मुलगी शेतावर बकºया चारण्यासाठी गेले असताना तिकडूनच रुकमी हिने त्या दोघींना गावाबाहेरील नाक्यावरून प्रवासी वाहतूक करणाºया ट्रॅक्स गाडीतून आलापल्ली व तेथून भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे नेले. यावेळी त्या ट्रॅक्समध्ये गावातील एक ओळखीचा इसम दिसला असता कामानिमित्त आलापल्लीला जात असल्याचे महिलेने त्याला सांगितले.
लाहेरी येथे दिनेश कटीया पुंगाटी याच्याकडे त्या दोघींना ठेवून रुकमी नरोटी ही दि.२५ ला पुन्हा एटापल्लीत आली. आपल्यावर संशय येऊन नये म्हणून ती लाहेरीला नेऊन ठेवलेल्या महिलेच्या घरी जाऊन तिच्याबद्दल चौकशी करू लागली. त्यामुळे महिला बेपत्ता झाल्याने आधीच चिंतेत असलेल्या महिलेच्या घरच्या लोकांना तिच्याबद्दल संशय आला. त्यांनी रुकमीला उलटसुलट प्रश्न विचारले असता ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. त्यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तिने दोघींनाही लाहेरीत नेऊन ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर त्या दोघींना पोलिसांनी लाहेरी येथून एटापल्लीत आणले. मात्र त्या अजूनही आम्हाला त्या महिलेसोबतच जायचे आहे, असे सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून त्यांचे किती मनपरिवर्तन करण्यात आले हे लक्षात येते.
दरम्यान पोलिसांनी रुकमी नरोटी हिच्याविरूद्ध भादंवि कलम ३६३, ३६५, ३६८, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून तिला दोन दिवसांचा पीसीआरही मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन जगताप करीत आहे.