अन् पुलावरून महिलेने घेतली नदीत उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:28 AM2019-09-01T00:28:36+5:302019-09-01T00:29:35+5:30
वैनगंगा नदी पुलावर सकाळपासूनच एक महिला बसून होती. अनेक लोक नदीवर फिरण्याकरिता येतात, असे समजून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तिला विचारणा केली नाही. मात्र ११.३० वाजताच्या सुमारास तिने नदी पात्रात उडी घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदी पुलावरून एका अज्ञात महिलेने शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नदीच्या प्रवाहात उडी घेतली. परिसरात उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर पोलिसांनी धावपळ करत तिला बाहेर काढण्यासाठी जीवाचा आटापीटा केला, पण ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली.
वैनगंगा नदी पुलावर सकाळपासूनच एक महिला बसून होती. अनेक लोक नदीवर फिरण्याकरिता येतात, असे समजून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तिला विचारणा केली नाही. मात्र ११.३० वाजताच्या सुमारास तिने नदी पात्रात उडी घेतली. ही बाब रस्त्याने येणे-जाणे करणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर आरडाओरड करण्यास सुरूवात केली. काही नागरिकांनी याबाबतची माहिती देसाईगंज पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोधमोहीम हाती घेतली. मात्र नदीमध्ये पाणी अधिक होता. तसेच प्रवाह मोठा असल्याने दिवसभर शोधमोहीम राबवूनसुध्दा तिचा पत्ता लागला नाही. उडी घेणारी महिला नेमकी कोण आहे, हे रात्री उशीरापर्यंत कळू शकले नाही. देसाईगंज पोलिसांनी जवळपासच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये फोन करून बेपत्ता असल्याच्या नोंदीबाबत विचारणा केली, मात्र एकाही पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची नोंद नाही. सदर महिला ब्रह्मपुरी तालुक्यातील असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अन् ठाणेदाराने घेतली नदी प्रवाहात धाव
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देसाईगंजचे ठाणेदार प्रदीप लांडे यांनी घटनास्थळावरून काही दूर अंतरावर असेल्या कोंढाळा रेती घाटमार्गे थेट नदी पात्र गाठले. त्या ठिकाणी महिलेचा मृतदेह खोल पाण्यातून पुढे जात असल्याचे ठाणेदारांना दिसले. त्यांनी स्वत: लगेच नदी पात्रात उतरून मृतदेहाचा जवळपास एक किमीपर्यंत पाठलाग केला. परंतु पाण्याचा प्रवाह खुप जास्त होता. त्यामुळे खोल पाण्यात शिरणे शक्य झाले नाही. तरीही त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.