बहिणीच्या जाऊचा खून करून भासवली आत्महत्या, भामरागड तालुक्यातील थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 11:20 AM2023-05-22T11:20:47+5:302023-05-22T11:22:33+5:30

एक महिन्यानंतर आरोपीला ठोकल्या बेड्या

woman killed in bhamragad accused arrested after one month | बहिणीच्या जाऊचा खून करून भासवली आत्महत्या, भामरागड तालुक्यातील थरार

बहिणीच्या जाऊचा खून करून भासवली आत्महत्या, भामरागड तालुक्यातील थरार

googlenewsNext

भामरागड (जि. गडचिरोली) : सतत रागावत असल्याने बहिणीच्या जावेचा गळा आवळून खून करत नंतर तिचा मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्या भासवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही थरारक घटना (मलमपुदुपूर, ता. भामरागड) येथे घडली. एक महिन्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. कल्पना विलास कोठारे (३२, रा.मलमपुदुपूर) असे मृत महिलेचे नाव असून, गुड्डू दशरथ गावडे (२५, रा. इरपनार, ता. भामरागड) हा आरोपी आहे.

एक महिन्यापूर्वी कल्पना यांचा मृतदेह शेतात झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पती विलास यांनी आत्महत्या समजून लाहेरी पोलिस ठाण्यात माहिती दिली; मात्र घटनास्थळी भेट दिल्यावर पोलिसांना वेगळीच शंका आली. शवविच्छेदन अहवालात ही शंका खरी ठरली. कल्पना यांनी आत्महत्या केली नसून त्यांना कोणीतरी संपविल्याचे उत्तरीय तपासणी अहवालातून उघड झाले.

लाहेरी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला; पण सुगावा मिळत नव्हता. मृत कल्पना यांचा मलमपुदुपूर येथे पोल्ट्री व राइस मिलचा व्यवसाय होता. गुड्डू गावडे हा कल्पना यांच्या धाकट्या जावेचा भाऊ असून, तीन वर्षांपासून तो बहिणीकडेच राहायला होता. पोल्ट्री व राइस मिलच्या कामाचा सारा डोलारा कल्पना सांभाळत. त्यामुळे कामावरून कल्पना या गुड्डूला सतत जाब विचारत. त्याला अनेकदा त्या रागावल्या होत्या. त्यामुळे गुड्डूच्या मनात कल्पना यांच्याबद्दल राग होता. यातून महिनाभरापूर्वी त्याने कल्पना यांच्यावर पाळत ठेवली. रात्री त्या स्वच्छतागृहात जाण्यासाठी जाग्या झाल्या. यावेळी गुड्डूने पाठीमागून जाऊन त्यांचा गळा दाबून खून केला. यानंतर कोणाला शंका येऊ नये म्हणून स्वत:च मृतदेह दोरीने झाडाला लटकावून आत्महत्या केल्याचे भासविले; मात्र पोलिसांनी घटनेचा उलगडा करून खरा आरोपी शोधून काढलाच. पोलिस निरीक्षक संतोष काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुड्डू गावडेला उपनिरीक्षक संतोष काजळे, महादेव भालेराव यांनी ताब्यात घेतले. उपनिरीक्षक सचिन सरकटे तपास करत आहेत.

अंधश्रद्धाळू नातेवाईक; पोलिसांपुढे आव्हान

कोठारे कुटुंब व नातेवाईक हे देवभोळे आहेेत. त्यामुळे कल्पना यांचा मृत्यू हा दैवी कोप असल्याचा समज त्यांनी करून घेतला होता. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. पोलिसांनी घटनेच्या अनुषंगाने सर्व बाजूंनी चौकशी केली. यात गुड्डू गावडे हा कोठारे कुटुंबीयाकडे तीन वर्षांपासून राहत असल्याचे समोर आले. त्याच्या हालचालीही संशयास्पद होत्या, त्यामुळे त्याच्यावर पाेलिसांची नजर गेली, त्यानंतर त्यास पकडून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, कल्पना कोठारे यांचा खून करून गुड्डू गावडे हा त्यांच्याच घरात राहिला. १८ मे रोजी लाहेरी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. २० रोजी त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास २२ मेपर्यंत पोलिस काेठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष काजळे यांनी दिली.

Web Title: woman killed in bhamragad accused arrested after one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.