बसमधून दारू आणणाऱ्या महिलेस तीन वर्ष कारावास, 50 हजार रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 07:49 PM2020-01-06T19:49:32+5:302020-01-06T19:49:41+5:30
दंड न भरल्यास आणखी ९ महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
गडचिरोली : नागपूरवरून गडचिरोलीत येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमधून अनधिकृतपणे देशी दारूच्या बाटल्या आणणाऱ्या महिलेला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन.सी.बोरफळकर यांनी ३ वर्ष कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी ९ महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीच्या नेहरू वॉर्डमधील रहिवासी कुंदा हरिदास भोयर (३५) ही २२ जुलै २०१८ रोजी नागपूर ते गडचिरोली येणाऱ्या शिवशाही बस (क्रमांक एमएच २९, बीई १२१०) मधून येत होती. यावेळी तिने आपल्याजवळच्या पिशवीत देशी दारू सुपर सॉनिक रॉकेट संत्रा या कंपनीच्या ९० मिलीच्या ११० नग निप (किंमत ७,७००) आणल्या होत्या.
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सदर महिला अनधिकृतपणे विक्री करण्यासाठी दारू आणत असल्याची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर खरपुंडी नाक्यावर बसची तपासणी करण्यात आली. त्यात कुंदा पवार हिच्याजवळील दारू पकडून तिच्याविरूद्ध दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ ई अन्वये गुन्हा नोंदविला.
पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनात हवालदार सुदाम ईरमलवार यांनी तपास केला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड.अमर फुलझेले, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहर सुभाष सोरते यांनी काम पाहिले.