महिलांनी पकडली छत्तीसगडी दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:50 PM2019-07-04T22:50:45+5:302019-07-04T22:51:05+5:30
दारूबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छत्तीसगडमध्ये निर्मित हलक्या प्रतिची दारू सर्रास येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस झाले. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे बुधवारच्या रात्री दारूमुक्त महिला संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घेत व्यंकटेश बैरवार यांच्या शेताजवळून एक ट्रॅक्टरभर ‘गोवा’ कंपनीची छत्तीसगडी दारू जप्त केली. या दारूची किंमत ४ लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरूमगाव : दारूबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छत्तीसगडमध्ये निर्मित हलक्या प्रतिची दारू सर्रास येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस झाले. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे बुधवारच्या रात्री दारूमुक्त महिला संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घेत व्यंकटेश बैरवार यांच्या शेताजवळून एक ट्रॅक्टरभर ‘गोवा’ कंपनीची छत्तीसगडी दारू जप्त केली. या दारूची किंमत ४ लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, येथून काही अंतरावर असलेल्या रिडवाईच्या जंगलाकडील व्यंकटेश बैरवार यांच्या शेताजवळ दारूच्या बाटल्यांनी भरलेला एक ट्रॅक्टर चिखलात फसल्याची माहिती गावातील महिलांना समजली. रात्री ८ वाजले होते, पण त्यांनी घटनास्थळी जाण्याचा निर्धार केला. सरपंच प्रियंका नैताम, उपसरपंच शिवप्रसाद गवरना, मुनीर शेख यांच्यासह दारूमुक्ती महिला संघटनेच्या अध्यक्ष सायराबेगम शेख, सचिव लिलाबाई धुरकुरिया, बिंदीया मडकाम, पुष्पा कोटवार, प्रतिभा उईके, भाविका अतला, निराशा कुंजाम, आसोबाई हिड्डा, अनाबाई हिड्डा, बुधोबाई भोयर आदी महिलांनी हिंमत दाखवत जंगलाच्या दिशेने कुच केले. सदर महिलांची ती हिंमत पाहून दारू तस्करांनी त्यांना धमकावण्याचा आणि त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालविण्याचाही प्रयत्न केला. पण महिलांनी हिंमत हारली नाही. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य लता पुनघाटे यांनी याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. पण तोपर्यंत घटनास्थळावरून दारूच्या बाटल्यांनी भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक पीकअप वाहन पसार झाले. तसेच फसलेल्या ट्रॅक्टरमधील दारूच्या बाटल्या तिथेच फेकून देण्यात आल्या. पहाटे दुसरा एक ट्रॅक्टर नेऊन महिलांनी त्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
पोलिसांवर महिलांचा रोष
या भागात छत्तीसगडी दारूची मोठ्या प्रमाणात आयात होते. स्थानिक तस्काराकडून ही दारू गडचिरोलीपर्यंत पोहोचविली जाते. परंतू मुरूमगाव पोलीसच त्या तस्करीला संरक्षण देत असल्याचा आरोप महिलांनी केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.