तीन गावांतील महिला दारू विक्रीच्या तक्रारीसाठी ट्रॅक्टरने पोहचल्या ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 12:10 PM2024-09-11T12:10:45+5:302024-09-11T12:13:32+5:30
पलिसांपुढे मांडली कैफियत : विक्रेत्यांवर तत्काळ कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील बाम्हणी, भगवानपूर, मोहडोंगरी येथील महिलांनी तिन्ही गावात सुरू असलेल्या दारू विक्री विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मंगळवारी गडचिरोली पोलिस स्टेशन गाठून आमच्या गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या महिलांनी आपल्या गावापासून गडचिरोली पोलिस ठाण्यापर्यंतचा प्रवास ट्रॅक्टरने केला.
बाम्हणी ग्रामपंचायत अंतर्गत मोहडोंगरी, बाम्हणी व भगवानपूर या गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. या तिन्ही गावांमध्ये दारू विक्री होत असल्याने परिसरातील गावांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावांमध्ये दारू व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याने गावातील दारू विक्री थांबविण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटन प्रयत्न करीत आहे. गावातील महिलांनी अहिंसक कृतीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट करून अवैध धंदे बंद करण्याची ताकीद दिली.
तसेच आतापर्यंत पोलिस विभागाच्या माध्यमातून या परिसरातील दारू विक्रेत्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. तरीसुद्धा संबंधित गावातील काही दारूस विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेता तिन्ही गावातील लोकांनी आपल्या गावात दारू विक्री बंदीचा निर्णय घेतला.
साहेब, आमचे गाव दारूमुक्त करा
मोहडोंगरी, बाम्हणी व भगवानपूर या तीनही महिलांनी गडचिरोली पोलिस स्टेशन गाठून पोलिस निरीक्षकांच्या नावे निवेदन सादर केले. आपल्या गावात अवैध दारू विक्रीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या मांडल्या. गावातील विक्रेत्यांवर कारवाई करून आमचे गाव दारू मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या, अशी मागणी महिलांनी पोलिसांकडे निवेदनातून केली.