दारूबंदीसाठी महिला एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:07 PM2019-07-22T23:07:28+5:302019-07-22T23:07:47+5:30
तालुक्यातील मुरूमगाव येथील शिवारात दारू पकडताना महिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. तसेच पन्नेमारा येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील मुरूमगाव येथील शिवारात दारू पकडताना महिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. तसेच पन्नेमारा येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत आहे. त्यामुळे आरोपी बहिरवार याला अटक करावी व पन्नेमारा येथील दारूविक्री पूर्णत: बंद करावी, या मागणीसाठी मुरूमगाव, खेडेगाव, बेलगाव येथील मुक्तिपथ गावसंघटनेच्या महिलांनी रविवारी मुरूमगाव येथे निर्भय रॅली काढली. या रॅलीत तिन्ही गावातील शेकडो महिला यात सहभागी झाल्या होत्या.
मुरूमगावसह खेडेगाव, बेलगाव येथील महिला गावातील दारूविक्रेत्यांविरोधात लढा देत आहे. गावातील दारूविक्री त्यांनी रोखून धरली आहे. पण नजीकच्या पन्नेमारा गावात दारूचा महापूर आहे. याचा विपरित परिणाम इतर गावातील दारूबंदीवर होत आहे. त्यामुळे या गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी या तीनही गावातील महिला एकवटल्या आहेत.
त्याचबरोबर मुरूमगाव परिसरात दारूविक्री आणि महिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा व्यंकटेश बहिरवार अद्यापही फरार आहे. त्याला पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे या दोन्ही मागण्यांसाठी रविवारी खेडेगाव, बेलगाव आणि मुरूमगाव येथील महिलांनी निर्भय रॅली काढली. मुरूमगाव पोलीस मदत केंद्रात या रॅलीचा समारोप झाला.
महिलांनी पोलिसाची भेट घेऊन बहिरवारच्या अटकेबद्दल चौकशी करीत तपासाची स्थिती जाणून घेतली. आरोपीस अटक न झाल्याने आमच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे आरोपीस तत्काळ अटक करण्यासंदभार्तील निवेदन महिलांनी पोलिसांना दिले.
महिलांनी घाबरण्याचे कारण नाही, पोलीस आरोपीच्या मागावर असल्याचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी सांगितले. नही चलेगी, नही चलेगी, गुंडागर्दी नही चलेगी, अशी कशी होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही, मुरूमगाव झाकी है, पन्नेमारा बाकी है, मुरूमगाव मी रहना होगा, दारूबंद करना होगा, अशा घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. सदर रॅली सरपंच प्रियांका कुजाम, उपसरपंच शिवप्रसाद गवर्णा, सायरा शेख, बिंदिया मडकांब, प्रतिभा उईके, ग्रा. पं. सदस्य मुनीर शेख यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.
महिला करणार धडक कारवाई
पन्नेमारा या गावी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने याचा त्रास इतरही गावांना होत आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतला आधी सूचना वजा निवेदन पाठविले जाणार आहे. तरीही येथील दारूविक्री न थांबल्यास या तिन्ही गावातील महिला पन्नेमारा येथे जाऊन धाडसत्र राबविणार आहे.