महिला रुग्णालयाची पदभरती लवकरच
By admin | Published: September 11, 2016 01:32 AM2016-09-11T01:32:52+5:302016-09-11T01:32:52+5:30
येथील महिला रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य शासनाने मान्यता दिली असून लवकरच पदभरती घेतली जाणार आहे,
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची विविध विषयांवर चर्चा
गडचिरोली : येथील महिला रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य शासनाने मान्यता दिली असून लवकरच पदभरती घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
खा. अशोक नेते, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महिला रुग्णालयातील पदे भरण्याबाबतची मागणी केली होती. त्यावेळी सदर माहिती मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली. गडचिरोली येथील महिला रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र पदभरती झाली नसल्याने रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे महिला रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयावरही अतिरिक्त ताण पडत आहे. ही बाब भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये पदांना मान्यता दिली आहे. जाहिरात काढून लवकरच पदभरती घेतली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महिला रुग्णालय सुरू झाल्यास महिला रुग्णांसाठी सोयीचे होणार आहे. पदभरती तत्काळ करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)