राखी, गुरवळातील महिलांनी दारू अड्डे केले उद्ध्वस्त, सव्वा लाखाचा मुद्देमाल नष्ट
By दिलीप दहेलकर | Published: October 13, 2023 03:18 PM2023-10-13T15:18:05+5:302023-10-13T15:21:13+5:30
दारूविक्रेत्यांना चपराक
गडचिरोली : तालुक्यातीच्या राखी, गुरवळा येथील दारूबंदी गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्त कृती करून दारूविक्रेत्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. विविध ठिकाणी मिळून आलेला १ लाख २० हजारांचा मोहसडवा व साहित्य नष्ट केले.
गडचिरोलीवरून १२ किमी अंतरावर राखी गाव आहे. राखी गावात मोहा, देशी, विदेशी दारू विक्री सुरू असल्याने शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून आर्थिक व आरोग्याचे नुकसान होत आहे. युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेता राखी, गुरवळा या दोन्ही गावांनी एकत्र येत दारू बंदीसाठी विशेष ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेत ठराव पास करुन दारू बंदीचा निर्णय घेण्यात आला तसेच मुक्तीपथ गाव संघटन गठित करून दारू विक्रेत्याला तोंडी सूचना देण्यात आल्या.
दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. तरीसुद्धा मुजोर विक्रेत्यांनी दारू विक्री सुरू ठेवली आहे. आता गाव संघटनेच्या महिलांनी गावाला दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अशातच शेतशिवारात हातभट्टी लावून मोहफुलाची दारू काढून विक्री करतात, ही माहीती गाव संघटनेला मिळाली. माहितीच्या आधारे शेताशिवारात शोधमोहीम राबवून वेगवेगळ्या ठिकाणाहून २३ ड्रम मोह सडवा व साहित्य मिळून १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या मोहिमेत राखी, गुरवळा येथील गाव संघटन व मुक्तीपथ टीम सहभागी होती.