कुटुंब नियाेजनात महिलांचीच आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:39 AM2021-02-09T04:39:33+5:302021-02-09T04:39:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : ‘छाेटे कुटुंब सुखी कुटुंब’ हा नारा देऊन शासनाकडून कुटुंब कल्याण नियाेजन कार्यक्रमाची जाेरदार जनजागृती ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ‘छाेटे कुटुंब सुखी कुटुंब’ हा नारा देऊन शासनाकडून कुटुंब कल्याण नियाेजन कार्यक्रमाची जाेरदार जनजागृती गेल्या काही वर्षात करण्यात आली. याचा परिणाम म्हणजे कुटुंब कल्याण नियाेजनाची शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, कुटुंब नियाेजनात गडचिराेली जिल्ह्याची आकडेवारी बघितली असता, या शस्त्रक्रिया करण्यात महिलाच आघाडीवर असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. विशेष म्हणजे गतवर्षी ३ हजार १३१ महिलांनी कुटुंब नियाेजनाची शस्त्रक्रिया केली आहे तर २ हजार २४२ पुरूषांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. महिलांचे प्रमाण व टक्केवारी पुरुषांपेक्षा अधिक आहे.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात गडचिराेली जिल्हा प्रशासनाला कुटुंब कल्याण नियाेजन कार्यक्रमांतर्गत एकूण ६ हजार ५७७ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट हाेते. यापैकी ५ हजार ३०० इतक्या नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये ३ हजार १३१ महिलांनी शस्त्रक्रिया केली तर २ हजार २४२ पुरूषांनीही नसबंदी केली. महिला नसबंदीचे प्रमाण ५८ टक्के आहे तर पुरूष नसबंदीचे प्रमाण ४२ टक्के आहे. केवळ महिलांचा विचार केल्यास सन २०१९मध्ये महिला नसबंदीचे प्रमाण ८३ टक्के आहे तर पुरूष नसबंदीचे प्रमाण ८० टक्केच्या खाली आहे.
वाढत्या महागाईत दाम्पत्य एक किंवा दाेन अपत्यांवरच कुटुंब नियाेजन करण्यास पसंती देतात. कुटुंब नियाेजन शस्त्रक्रिया पुरूष किंवा महिला या दाेघांपैकी एकाने केली तरी पाळणा थांबवता येताे. पण पाळणा थांबविण्यासाठी कुटुंबाच्या तसेच सामाजिक दबावामुळे कुटुंब नियाेजन शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलाच पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. पुरूष नसबंदीसंदर्भात अनेक गैरसमज असल्याने पुरूष कुटुंब नियाेजनासाठी धजावत नाहीत.
बाॅक्स...
हे आहेत गैरसमज
पुरूष प्रधान संस्कृतीमुळे पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळत नाही. पुरूषत्वावर परिणाम हाेताे, असा गैरसमज पुरुषांमध्ये आहे. काही घरातील स्त्रियादेखील पुरूष नसबंदीला विराेध करताना दिसून येतात. पुरूषांसाठीची शस्त्रक्रिया साेपी असून, ती काही मिनिटातच पूर्ण हाेते. नसबंदी शस्त्रक्रियेने पुरूषाची ताकद कमी हाेते. जड अर्थात ताकदीची कामे करणे शक्य हाेत नाही, असे अनेक गैरसमज असल्याने पुरूष नसबंदीसाठी पुढे येत नाहीत. समाजातील मानसिकता बदल्याशिवाय पुरूष नसबंदीचे प्रमाण वाढणार नाही. पुरूष नसबंदी ही झटपट हाेणारी शस्त्रक्रिया आहे. स्त्री नसबंदीपेक्षा ती साेपी आणि सुरक्षित आहे. या शस्त्रक्रियेनंतर तासाभरात पुरूषाला घरी जाता येते.
बाॅक्स....
काेराेना प्रादुर्भावामुळे यंदा उद्दिष्ट राहणार अपूर्ण
जिल्ह्याच्या आराेग्य विभागाला सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ६ हजार ५७० एवढ्या नसबंदी शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत पुरूष व महिला मिळून फक्त २ हजार ४०६ इतक्या नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पुरूषांची टक्केवारी ३३ तर महिला नसबंदीची टक्केवारी ३९ आहे. काेराेना प्रादुर्भावामुळे उद्दिष्ट अपूर्ण राहणार आहे.