गडचिरोलीतील चकमकीत महिला नक्षलवादी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:02 PM2018-03-26T12:02:34+5:302018-03-26T12:02:45+5:30
एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावाजवळील अलेंगा जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावाजवळील अलेंगा जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली.
नक्षल्यांकडून २३ ते २९ मार्च दरम्यान ‘बंदी छोडो सप्ताह’ सुरू केला आहे. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी नक्षल विरोधी अभियान तीव्र केले आहे.
अलेंगा जंगल परिसरात नक्षल शोधमोहीम सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या नक्षल्यांनी सी-६० पोलीस पथकावर हल्ला केला. दरम्यान झालेल्या चकमकीत महिला नक्षलवादी ठार झाली. पोलिसांनी महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून जंगल परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे. मृत नक्षलवाद्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
भूसुरूंग केले निकामी
कोरची तालुक्यातील कोटगूल येथून चंदू उर्फ बारीकराव दलसू हिचामी (२१) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल व एक रिमोट जप्त केला. त्याची चौकशी केली असता, त्याने कोटगुल बाजार परिसरात दोन ठिकाणी भूसुरूंग पेरून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून भूसुरूंग निकामी केले.