महिलांनी थांबविली लोहदगडांची ओव्हरलोड वाहतूक
By admin | Published: November 9, 2016 02:32 AM2016-11-09T02:32:02+5:302016-11-09T02:32:02+5:30
एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोहखनिज उत्खननाचे काम सुरू झाले आहे
नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची मागणी : रस्ता व वजनमापाची व्यवस्था झाल्यानंतरच वाहतूक करा
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोहखनिज उत्खननाचे काम सुरू झाले आहे. येथून लोहखनिजाची वाहतूकही करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक यामुळे सुरू झाली आहे. लोहप्रकल्प तालुक्यातच निर्माण करावा, रस्ता व वजनमापाची व्यवस्था झाल्यानंतरच येथून वाहतूक सुरू करावी, अशी मागणी एटापल्लीच्या नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, उपाध्यक्ष रमेश गंप्पावार व जनहितवादी संघटनेचे संयोजक सुरेश बारसागडे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दरम्यान स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी मंगळवारी एटापल्ली येथे आंदोलन करून लोहदगड वाहतूक करणारे ट्रक थांबविले. त्यानंतर नाक्यावर नायब तहसीलदार व्ही. एस. चव्हाण, ठाणेदार शिवाजी राऊत, पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर दळवी यांच्याशी भेटून चर्चा केली व नायब तहसीलदारांनी चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर तहसील कार्यालयात नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, उपाध्यक्ष रमेश गंप्पावार, सुरेश बारसागडे, सचिन मोतकुरवार, महेश पुल्लुरवार, सशांक नामेवार जाऊन त्यांनी तहसीलदारांशी चर्चा केली. ट्रक रोखण्याच्या आंदोलनात दीक्षा झाडे, निर्मला ओंगुलवार, मंगला आत्राम, मंजू कारपेनवार, रूपा पुसाली, विना पेरमिलवार, जनाबाई दुर्गे, विमल अगरकाटे, निर्मला गावडे, यांच्यासह जनहितवादी समिती व सुरजागड बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)