ग्रामीण भागातील महिलांनी केली १२३ काेटींची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:50 AM2021-02-26T04:50:43+5:302021-02-26T04:50:43+5:30
प्रत्येक महिला खर्चात काटकसर करून बचत करण्याचा प्रयत्न करते. मात्र बचत कुठे करावी? असा प्रश्न ग्रामीण भागातील महिलांना पडतो. ...
प्रत्येक महिला खर्चात काटकसर करून बचत करण्याचा प्रयत्न करते. मात्र बचत कुठे करावी? असा प्रश्न ग्रामीण भागातील महिलांना पडतो. यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने उपाय शाेधत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांचे बॅंक खाते उघडावे, यासाठी माेहीम सुरू केली. प्रत्यक्ष बँक कर्मचारी गावात पाेहाेचून याेजनेची माहिती देत आहेत. त्यामुळे महिलांकडून अतिशय चांगला प्रतिसाद या याेजनेला मिळाला असल्याचे दिसून येते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे जिल्हाभरात एकूण सव्वाचार लाख ग्राहक आहेत. त्यापैकी सुमारे सव्वालाख ग्राहक महिला समृद्धी बचत ठेव याेजनेचे आहेत. बॅंक खाते काढण्याचे प्रमाण वाढण्यासाेबतच बचतीचे प्रमाणही वाढत आहे. जानेवारी २०२१अखेर महिला समृद्धी बचत ठेवअंतर्गत सुमारे १२२ काेटी ९६ लाख रुपये बचत झाले आहेत.
बाॅक्स .....
काेणत्याही तारणाशिवाय मिळते कर्ज
महिला समृद्धी बचत ठेव याेजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, सदस्य महिलेला गृहोद्याेग स्थापन करण्यासाठी काेणत्याही तारणाशिवाय कर्ज दिले जाते. जेवढी बचत आहे, त्याच्या जवळपास दाेन ते तीन पट कर्ज सुविधा उपलब्ध आहे. बचतीबराेबरच महिलांनी एखादा लहान उद्याेग सुरू करून त्या स्वावलंबी बनाव्यात हा यामागील सर्वांत महत्त्वाचा उद्देश आहे. आजपर्यंत ६ हजार ८०० महिलांनी १३ काेटी रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे.
काेट .........
आर्थिक विकासासाठी कुटुंबाची दाेन्ही चाके सक्षम असणे आवश्यक आहे. महिलांना बचतीची सवय लावण्याबराेबरच त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महिला समृद्धी बचत ठेव याेजना सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पुढेही या योजनेत आणखी महिला सहभागी होतील, असा विश्वास आहे.
- सतीश आयलवार,
सीईओ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गडचिराेली
तालुकानिहाय बॅंकखाते व बचत
तालुका बॅंक खाते बचत (काेटी)
काेरची ३,८५३ २.५६
कुरखेडा ९,४०८ ८.२४
देसाईगंज ६,०१३ ८.३९
आरमाेरी ११,३०९ १२.३५
धानाेरा ९,२६३ ८.३७
गडचिराेली १६,८१४ २७.९४
चामाेर्शी १९,३९० १७.०२
मुलचेरा ६,७४३ ५.३२
अहेरी १०,४०१ ११.५१
एटापल्ली ८,४७८ ६.३३
सिराेंचा १२,७४२ ११.३७
भामरागड ५,७१४ ३.५६
एकूण १,२०,१२८ १२२.९६