अंकिसात महिलांचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:30+5:30
आसरअली पोलीस स्टेशनअंतर्गत येणारे अंकिसा हे गाव तालुक्यातील दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. या गावामुळे आसपासच्या गावांनी केलेली दारूबंदी प्रभावित होत आहे. काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ चमूने गाव संघटनेच्या महिलांसह येथील २६ विक्रेत्यांकडे धाडी मारून कारवाई केली होती. तसेच या विक्रेत्यांची यादीही पोलिसांना दिली. पण अद्याप ठोस कारवाई न झाल्याने दारूविक्री सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गावातील दारूविक्री बंद करा आणि पोलिसांना नावे दिलेल्या दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी तालुक्यातील अंकिसा येथे सोमवारी (दि.१८) सिरोंचा मार्गावर महिलांनी तीन तास चक्काजाम केला. यात १२ गावातील जवळपास १०० महिला व अंकिसा येथील युवक सहभागी झाले होते. कारवाई न झाल्यास पुढचे आंदोलन थेट जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्याचा निर्धार महिलांनी यावेळी बोलून दाखविला.
आसरअली पोलीस स्टेशनअंतर्गत येणारे अंकिसा हे गाव तालुक्यातील दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. या गावामुळे आसपासच्या गावांनी केलेली दारूबंदी प्रभावित होत आहे. काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ चमूने गाव संघटनेच्या महिलांसह येथील २६ विक्रेत्यांकडे धाडी मारून कारवाई केली होती. तसेच या विक्रेत्यांची यादीही पोलिसांना दिली. पण अद्याप ठोस कारवाई न झाल्याने दारूविक्री सुरूच आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी अंकिसा-सिरोंचा रस्त्यावर ३ तास चक्काजाम आंदोलन केले.
या आंदोलनात बालमुत्त्यमपल्ली, गेरापल्ली, जंगलपल्ली, लक्ष्मीदेवपेठा, लक्ष्मीदेव रै., अंकिसा माल, अंकिसा चक, केवलपेठा, रंगधामपेठा, जोड्पल्ली, दुब्बापल्ली, वडधम येथील जवळपास १०० महिला सहभागी झाल्या होत्या. गावात दारूविक्री बंद व्हावी यासाठी युवकही मोठ्या प्रमाणात पुढे आले आहेत. या महिलांच्या समर्थनार्थ तेही आंदोलनात दोन्ही बाजूला मानवी साखळी तयार करून उभे होते. चक्काजाम आंदोलनाची दखल घेत आसरअली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मोरेश्वर दराडे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांना आंदोलनकर्त्यांनी मागणीचे निवेदन देत विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी विनंती केली. तीन तासानंतर हे आंदोलन थांबल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.