महिलांनी मेहनतीतून आत्मनिर्भर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:00 AM2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:21+5:30

जगात सर्वात जास्त सन्मान महिलांचा केला जातो. आई म्हणून केवळ जन्म न देता राष्ट्र घडविण्याचे काम आज स्त्री करताना दिसत आहे. महिला आज बचतगटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्या कुक्कुटपालन, शेती आणि अन्य व्यवसाय उद्योग करून कुटुंबाच्या आर्थिक समृद्धीस हातभार लावीत आहे. आपणाला सर्वच मोफत मिळाले तर त्याचे महत्त्व नसते, त्यामधून आपण गुलाम होऊ.

Women should be self-reliant through hard work | महिलांनी मेहनतीतून आत्मनिर्भर व्हावे

महिलांनी मेहनतीतून आत्मनिर्भर व्हावे

Next
ठळक मुद्देराज्यपाल भगतसिंह कोश्यारी : अहेरी येथील उडान सोलर पॅनेल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महिलांनी सुरू केलेला उडान सौर ऊर्जा प्रकल्प हा केवळ या जिल्ह्यापुरता मर्यादित राहू नये. बचत गटांच्या माध्यमातून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून जास्तीत जास्त सोलर पॅनेल निर्मिती करण्यासाठी मेहनत घेऊन त्यांनी आत्मनिर्भर व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
अहेरी येथे १८ डिसेंबर रोजी उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने संचालित उडान सोलर एनर्जी प्रा. लि. चे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरीचे प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरीच्या नगराध्यक्ष, हर्षा ठाकरे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य परीचालन अधिकारी रवींद्र शिंदे, आयआयटी मुंबईच्या तांत्रिक मार्गदर्शक अभिलाशा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, हा सोलर पॅनल तयार करण्याचा प्रकल्प यशस्वी होऊन तो केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता या प्रकल्पातून उत्पादित होणारे सोलर पॅनल राज्याच्या बाहेर विक्रीला जावेत. माझे गृहराज्य असलेल्या उत्तराखंडमधील माज्या घराच्या छतावर देखील इथले सौर पॅनल लागलेले असतील इथपर्यंत हा प्रकल्प वाढावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या आजी-आजोबांनी देखील विचार केला नसेल की आपले नातू अहेरीसारख्या दुर्गम भागात सोलर पॅनेल तयार करतील आणि त्याच्या उद्घाटनाला राज्यपाल येतील.
जगात सर्वात जास्त सन्मान महिलांचा केला जातो. आई म्हणून केवळ जन्म न देता राष्ट्र घडविण्याचे काम आज स्त्री करताना दिसत आहे. महिला आज बचतगटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्या कुक्कुटपालन, शेती आणि अन्य व्यवसाय उद्योग करून कुटुंबाच्या आर्थिक समृद्धीस हातभार लावीत आहे. आपणाला सर्वच मोफत मिळाले तर त्याचे महत्त्व नसते, त्यामधून आपण गुलाम होऊ. ही गुलामगिरी झुगारण्यासाठी मेहनतीतून स्वावलंंबनाचा मार्ग महिलांनी शोधावा. सोलर ऊर्जेच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यास महिलांना मदत होईल, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.
प्रस्ताविकातून बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, एक ते दीड वर्षाच्या मेहनतीतून हा प्रकल्प साकारला आहे. १०० वॅटपेक्षा कमी क्षमतेच्या सोलर पॅनलची निर्मिती मोठ्या कंपन्या करत नाही. त्यामुळे अशा सोलर प्लेट बनवण्यास येथे प्राधान्य दिले जाईल. सोलर पॅनलची इथे केवळ निर्मितीच नव्हे तर देखभाल व दुरुस्ती होणार आहे. आयआयटी मुंबईसारख्या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनातून सोलार पॅनलचे उत्पादन होणार असून या कंपनीला नफ्यात कसे आणता येईल याकडे आपले लक्ष राहणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी हिरकणी महाराष्ट्राची नवउद्योजकता स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या जिल्ह्यातील धनलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता बचतगट देवलामारी (अहेरी), आदर्श महिला स्वयंसहाय्यता बचतगट धानोरा आणि आदर्श महिला स्वयंसहायता बचतगट नवरगाव (कोरची) या बचतगटांना राज्यपालांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रत्येकी दोन लक्ष रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.प्रारंभी राज्यपालांनी उडान सोलर एनर्जी प्रकल्पाचे फीत कापून उद्घाटन केले. प्रकल्पाची पाहणी करुन प्रकल्पातून उत्पादित करण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची माहिती तेथे काम करणाºया महिलांकडून जाणून घेतली. कार्यक्रमाला अहेरी भामरागड, सिरोंचा व एटापल्ली तालुक्यातील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

एलएलबी महिलेने वेधले राज्यपालांचे लक्ष
उडान एनर्जी प्रकल्पाच्या संचालक मंडळातील नुरी शेख यांनी यावेळी प्रकल्पाच्या उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. इथल्या महिलांना इथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महिलांचे कौशल्य यामधून विकसित होणार आहे. सौर ऊर्जेच्या वापराबद्दल जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे भाषण पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांनी तुमचे शिक्षण काय? असा प्रश्न त्यांना केला. तेव्हा नुरी शेख यांनी आपण एलएलबी असल्याचे सांगितले. हे ऐकून राज्यपाल अचंबित झाले.

Web Title: Women should be self-reliant through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.